
पाकिस्तान महिला संघाचा सलग तिसरा पराभव, बेथ मुनीचे आक्रमक शतक
कोलंबो ः बेथ मुनी (१०९) आणि अलाना किंग (नाबाद ५१) यांच्या विक्रमी फलंदाजी च्या जोरावर ऑस्ट्रेलिया महिला संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान महिला संघाला १०७ धावांनी पराभूत केले. हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा विजय आहे तर पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव ठरला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तान संघासमोर विजयासाठी २२२ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सदाफ शमास (५), मुनीबा अली (३) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर सिद्रा नवाज (५), नतालिया परवझे (१), आयमान फातिमा (०), कर्णधार फातिमा सना (११) ही मधली फळी देखील लवकर तंबूत परतली.
सिद्रा अमीन हिने सर्वाधिक ३५ धावा काढल्या. तिने पाच चौकार मारले. डायना बेग (७), नशरा संधू (११) यांनीही निराशा केली. रमीन शमीमला १५ धावांवर बाद करुन सदरलँडने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तान संघ ३६.३ षटकात ११४ धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. किम गार्थ (३-१४), मेगन शट (२-२५), सदरलँड (२-१५) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
१०व्या क्रमांकावर विक्रमी खेळी
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून २२१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून खेळणारी भारतीय वंशाची लेग-स्पिनर अलाना किंगने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने नाबाद ५१ धावा करून महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. किंग हिने ४९ चेंडूत तीन चौकार व तीन षटकार ठोकत नाबाद ५१ धावा काढल्या.
अलाना किंग पहिली खेळाडू
पाकिस्तान महिला संघाविरुद्धच्या सामन्यात एका वेळी ऑस्ट्रेलियन संघाने फक्त ११५ धावांत ८ गडी गमावले होते. फलंदाजी करताना अलाना किंगने बेथ मूनीसोबत केवळ डाव स्थिरावला नाही तर संघाला लढाऊ धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अलाना किंगने ५१ धावांच्या नाबाद खेळीदरम्यान तीन चौकार आणि तीन षटकार मारले. महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा जास्त धावा करणारी अलाना ही पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी, हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या माजी महिला संघातील खेळाडू युलांडी व्हॅन डेर मेरवे यांच्या नावावर होता, ज्यांनी २००० मध्ये भारतीय महिला संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ४२ धावा केल्या होत्या.
अलाना किंग आणि बेथ मूनी यांनी मिळून हा विक्रम मोडला
बेथ मूनी आणि अलाना किंग यांनी पाकिस्तान महिला संघाविरुद्धच्या सामन्यात नवव्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात नवव्या विकेटसाठी किंवा त्यापेक्षा कमी धावांची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी, हा विक्रम अॅशले गार्डनर आणि किम गार्थ यांच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात नवव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली होती. बेथ मुनी हिने ११४ चेंडूंत १०९ धावांची संस्मरणीय शतकी खेळी केली. तिने ११ चौकार मारले. नशरा संधू (३-३७), फातिमा सना (२-४९), रमीन शमीम (२-२९) यांनी प्रभावी गोलंदाजीा केली.