
सिराजला विश्रांती, प्रसिद्ध कृष्णाला संधीची शक्यता
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना गुरुवार, १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होत आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत दमदार विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दिल्ली कसोटीत विजय मिळवून क्लीन स्वीप साधण्यावर संघाचे लक्ष आहे. तथापि, भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष केवळ विजयावरच नव्हे तर खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटकडेही असेल.
सिराजला विश्रांती, प्रसिद्ध कृष्णा संधीची शक्यता
पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या पुनरागमनाची झलक दाखवली. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली असल्याने तो दिल्ली कसोटीत खेळण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, मोहम्मद सिराजला विश्रांती देण्याचा विचार गंभीरपणे केला जात आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया मालिकेत सिराजची भूमिका महत्त्वाची असल्याने संघ त्याला ओव्हरलोड होऊ देऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत, प्रसिद्ध कृष्णा याला भारतीय भूमीवरील पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. नेट सत्रांमध्ये त्याने सातत्याने प्रभावी गोलंदाजी केली असून संघ व्यवस्थापन त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवत आहे.
फिरकी त्रिकूट पुन्हा मैदानात उतरणार
अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फिरकीपटूंना अनुकूल राहिली आहे. काळ्या मातीमुळे चेंडूला सुरुवातीपासूनच वळण मिळते आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मोठा फायदा होतो. २०२३ मध्ये याच मैदानावर भारताने तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.या पार्श्वभूमीवर भारत पुन्हा एकदा रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी त्रिकूटावर विश्वास ठेवेल अशी अपेक्षा आहे. हे तिघेही घरच्या मैदानावर प्रभावी ठरले असून अलीकडच्या सामन्यांमध्ये त्यांनी अपवादात्मक कामगिरी केली आहे.
फलंदाजी क्रमात बदलाची शक्यता नाही
पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भक्कम कामगिरी करत संघाचा पाया मजबूत केला होता. त्यामुळे फलंदाजी क्रमात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल ही सलामी जोडी पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळेल. कर्णधार शुभमन गिल, यष्टिरक्षक ध्रुव जुरेल, तसेच मधल्या फळीतल्या अनुभवी खेळाडूंवर विजयाची जबाबदारी असेल. भारतासाठी हा सामना केवळ मालिकेचा शेवट नाही, तर घरच्या मैदानावर वर्चस्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी असेल.