
छत्रपती संभाजीनगर : शेख हबीब मेमोरियल क्रिकेट टी-२० स्पर्धेत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने इथिकल क्रिकेट अकॅडमीवर १२० धावांच्या प्रचंड फरकाने दणदणीत विजय मिळवला.
हा सामना गरवारे स्टेडियमवर खेळविण्यात आला. नाथ ड्रीप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. निर्धारित २० षटकांत त्यांनी ६ गडी गमावत १८२ धावांची भक्कम मजल मारली. संघाच्या विजयात ऋषिकेश सोनवणे याने ३८ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांसह ६० धावांची झळाळती खेळी केली. त्याला अजय शितोळे (३४), नयन चव्हाण (३१) आणि विश्वजीत राजपूत (२६) यांची प्रभावी साथ लाभली.
इथिकल क्रिकेट अकॅडमीकडून गोलंदाजीत राजेश शिंदे (२/३३), मयुरी वैष्णव (१/३१) आणि योगेश लिंगायत (१/२१) यांनी प्रत्येकी एक-दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, इथिकल क्रिकेट अकॅडमीचा डाव नाथ ड्रीपच्या भेदक गोलंदाजीसमोर कोसळला. संपूर्ण संघ फक्त ६२ धावांवर १६.४ षटकांत गारद झाला. त्यांच्याकडून मोहित घाणेकर हा एकमेव फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला.नाथ ड्रीपच्या गोलंदाजीत दृत खोसे यांनी अचूक माऱ्याने ४ षटकांत १२ धावांत ३ गडी बाद केले, तर मिलिंद जाधव यांनी ४ षटकांत ३ गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांचा प्रतिकार मोडून काढला.सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ऋषिकेश सोनवणे याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
पुरस्कार समालोचक अॅड शाम देशमुख आणि विजय ॲडलकोंडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.स्पर्धेचे यशस्वी आयोजन अॅड संजय डोंगरे, प्रदीप राठोड, अमोल पगारे, किरण भोळे आणि प्रमोद उघाडे या क्रीडाप्रेमींनी केले असून, संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला.