
अंतिम सामन्यात केरळचा पराभव, महाराष्ट्र संघ तिसऱ्या स्थानावर
जळगाव ः अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या सीआयएससीई १७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम बंगालच्या संघाने केरळवर ८२ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला तिसरे स्थान मिळाले. महाराष्ट्राचा आदर्श गव्हाणे सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला तर ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून केरळच्या नवीन पॉल याची निवड झाली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य आणि जैन इरिगशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. केरळने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु पश्चिम बंगालच्या संघाने जोरदार सुरुवात करत केरळचा निर्णय चुकीचा ठरवला. पश्चिम बंगालने २० षटकांत चार गडी गमावत १६६ धावा केल्या. त्यानंतर १६७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केरळ संघाचे फलंदाज टिकाव धरु शकले नाही. बंगालच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. त्यामुळे केरळचे एकामागे एक फलंदाज बाद होत गेले. केरळच्या संघाने २० षटकांत ९ गडी गमावून ८४ धावाच करता आल्यात. यामुळे पश्चिम बंगालचा ८२ धावांनी विजय झाला. अंतिम सामन्यात “मॅन ऑफ द मॅच” पुरस्कार दिपन्कन दासगुप्ता (पश्चिम बंगाल) यांना मिळाला.
महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
तिसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि तामिळनाडू या संघात लढत झाली. या लढतीत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत निर्धारित १२ षटकांत दोन गडी गमावून १२३ धावा केल्या. त्यात आदर्श गव्हाणे याने जोरदार फटकेबाजी करत ३२ चेंडूत ५१ धावा केल्या. रणवीरने २३ चेंडूत ४० धावा केल्या. महाराष्ट्राच्या १२४ धावांच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी तामिळनाडूचा संघ मैदानात उतरला. परंतु तामिळनाडूचे फलंदाज १२ षटकांत ८ गडी गमावून ९४ धावाच करु शकले. यामुळे महाराष्ट्राने २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
अशी झाली स्पर्धा
या स्पर्धेत एकूण २६० खेळाडू सहभागी झाले होते. तीन मैदानांवर एकूण १९ सामने खेळले गेले. या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू, पोर्ट बेअर, अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिशा, वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, बिहार, झारखंड, केरळ, दुबई असे विविध राज्यांचे संघ सहभागी झाले होते. सर्व संघानी मिळून तब्बल ३,८३७ धावा काढल्या.
स्पर्धेतील मॅच ऑफिशियल्स म्हणून कुणाल खलसे, अमन शर्मा, आकाश सानप आणि गोपीनाथ जाधव यांनी जबाबदारी पार पाडली. स्कोअरिंगचे काम महम्मद फजल, मनीष चौबे यांनी केले.
अनुभूती निवासी स्कूलमध्ये झालेल्या पारितोषिक समारंभ प्रसंगी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीष दास उपस्थित होते. अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
अनुभूती स्कूलतर्फे आयोजित या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, प्रशिक्षक तन्वीर अहमद, अजित घारगे, योगेश ढोंगडे, मुस्ताक अली, उदय सोनवणे, घनश्याम चौधरी, राहुल निंभोरे, शशांक अत्तरदे, समीर शेख, जयेश बाविस्कर, किशोरसिंग शिसोदिया, प्रवीण ठाकरे, मोहम्मद फजल, सय्यद मोहसिन, अब्दुल मोहसिन, नचिकेत ठाकूर, अमित गंवादे, अनुभूती स्कूलचे विक्रांत जाधव, भिकन खंबायत, विकास बारी, शुभम पाटील, रवी साबळे, गणेश सपकाळे आणि फिजिओथेरॉपिस्ट निकीता वाधवाणी, कीर्ती धनगर यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
बेस्ट फिल्डर – तरुण कुमार (तामिळनाडू), बेस्ट विकेट कीपर – नवीन पॉल (केरळ), बेस्ट बॉलर – आर्यन सिंग (वेस्ट बंगाल), बेस्ट बॅट्समन – आदर्श गव्हाणे (महाराष्ट्र), बेस्ट ऑलराउंडर ऑफ द सिरीज – नवीन पॉल (केरळ), फेअर प्ले ट्रॉफी – तामिळनाडू संघ.