
आंतरशालेय आणि औद्योगिक स्पर्धा विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके – सतीश मांडे
छत्रपती संभाजीनगर : व्हेरॉक उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षी उत्साहात पार पडणारी व्हेरॉक क्रिकेट स्पर्धा २०२५ यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपासून या स्पर्धांचा थाटात शुभारंभ होणार असून, यात आंतर शालेय क्रिकेट ट्रॉफी आणि औद्योगिक क्रिकेट ट्रॉफी अशा दोन प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे, अशी माहिती व्हेरॉक ग्रुपचे इमप्लॉई रिलेशन हेड व सीएसआरचे सतीश मांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे ओझालेल्या पत्रकार परिषदेत सतीश मांडे व स्पर्धा आयुक्त राहुल टेकाळे, तसेच अनंत नेरळकर, दिनेश कुंटे यांनी मीडियाशी संवाद साधत या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. या दोन्ही स्पर्धा जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाचा सोहळा ठरणार आहेत.
आंतरशालेय क्रिकेट ट्रॉफी
व्हेरॉक उद्योग समूहाने सन २००६-०७ पासून शालेय क्रिकेट खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेची सुरुवात केली. मागील १६ वर्षांत अनेक उदयोन्मुख खेळाडूंनी या मंचावरून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.
यंदा या १७व्या स्पर्धेत २० आमंत्रित शाळा सहभागी होत असून, ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर संघांची निवड करण्यात आली आहे. सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत. सर्व सामने गरवारे स्टेडियम आणि एमआयटी मैदानावर पार पडतील. उद्घाटन व अंतिम सामना हा प्रकाशझोतात होणार असून, प्रत्येक दिवशी तीन रोमांचक सामन्यांचे आयोजन करण्यात येईल.
आंतरशालेय स्पर्धेतील बक्षिसे
विजेता संघ – १,३१,००० रुपये, चषक आणि प्रमाणपत्र.
उपविजेता संघ – ९५,००० रुपये, चषक आणि प्रमाणपत्र
मॅन ऑफ द सिरीज – मोपेड बाईक
सर्वोत्तम फलंदाज – २५,००० रुपये
सर्वोत्तम गोलंदाज – २५,००० रुपये
मॅन ऑफ द मॅच – आकर्षक बॅग
या आकर्षक पारितोषिकांमुळे शालेय क्रिकेटपटूंचा उत्साह दुप्पट झाला आहे.
औद्योगिक क्रिकेट ट्रॉफी – उद्योग व क्रीडा यांचा संगम
व्हेरॉक समूहाने सन २००४-०५ पासून औद्योगिक क्रिकेट स्पर्धेची परंपरा सुरू केली. या माध्यमातून विविध औद्योगिक व बिगर-औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आणि खेळाडूंना एकत्र आणून क्रीडा आणि मैत्रीभाव वृद्धिंगत केला जातो.
या वर्षीच्या १९व्या आवृत्तीत २० संघ सहभागी होत आहेत. त्यापैकी १० संघ उद्योग क्षेत्रातील तर १० संघ बिगर-उद्योग क्षेत्रातील असतील. सर्व सामने गरवारे स्टेडियम येथे होणार असून, उद्घाटन व अंतिम सामन्याचा थरार देखील प्रकाशझोतात अनुभवता येईल.
औद्योगिक स्पर्धेतील बक्षिसे
विजेता संघ – १,५१,००० रुपये आणि चषक
उपविजेता संघ – १,११,००० रुपये आणि चषक
मॅन ऑफ द सिरीज – बाईक
सर्वोत्तम फलंदाज – २५,००० रुपये
सर्वोत्तम गोलंदाज – २५,००० रुपये
मॅन ऑफ द मॅच – आकर्षक भेटवस्तू
संयोजन समितीचे योगदान
या दोन्ही स्पर्धांचे यशस्वी आयोजन खालील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. त्यात स्पर्धा आयुक्त राहुल टेकाळे, दिनेश कुंटे, अनंत नेरळकर, सय्यद जमशिद, प्रदीप राठोड, मच्छिंद्र जाधव यांचा समावेश आहे.
या समितीच्या प्रभावी नियोजनामुळे स्पर्धा दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
खेळाडू, शाळा व उद्योग क्षेत्रातील उत्सुकता शिगेला
या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक तरुण खेळाडूंना क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करण्याची संधी मिळते. आंतरशालेय स्तरावर नवोदित क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव तर औद्योगिक स्तरावर कर्मचाऱ्यांना क्रीडेद्वारे एकत्र येण्याची संधी मिळते. त्यामुळे वारॉक टूर्नामेंट ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून एक क्रीडा महोत्सव बनली आहे.
व्हेरॉक समूहाचा उद्देश – खेळाद्वारे आरोग्य आणि संघभावनेचा विकास
व्हेरॉक समूहाचे संस्थापक आणि आयोजक मंडळ यांचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करणे हा नसून, शालेय पातळीपासून ते औद्योगिक पातळीपर्यंत खेळाडू घडवणे, क्रीडाभाव वाढवणे आणि सामाजिक आरोग्य वृद्धिंगत करणे हा आहे. “आमचे ध्येय आहे – खेळाच्या माध्यमातून शिस्त, संघभावना आणि उत्साह जागवणे,” असे सतीश मांडे यांनी सांगितले.