
सोलापूर ः म्हैसुर येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत भारती विद्यापीठ जी एस पवार प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या नैतिक सागर होटकर याने उल्लेखनीय कामगीरी करीत १४५० गुणांकन प्राप्त केले आहे.
या स्पर्धेत कर्नाटकसह, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यातील ३२६ खेळाडू सहभागी झाले होते. सोलापूर चेस अकॅडमीच्या नैतिकने स्पर्धेत आकर्षक खेळ करत महाराष्ट्राच्या आंतराष्ट्रीय गुणांकन प्राप्त श्रीनिवास विश्रुथ (१४९५) व कर्नाटकचा आध्य कार्तिक (१५२०) यांच्याशी बरोबरी साधत आंतराष्ट्रीय गुणांकन मिळविण्यासाठी असणारा निकष पूर्ण करीत आंतराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले. नैतिकला आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त उदय वगरे तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच नैतिकचे आईवडील सुरेखा पवार व सागर पवार, मुख्याध्यापिका विजया गोळे, वर्गशिक्षक जगन्नाथ कोळेकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
नैतिकने संपादन केलेल्या यशाबद्दल सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी कौतुक करीत अभिनंदन केले.