संभाजीनगर टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा १६ ऑक्टोबरपासून रंगणार

  • By admin
  • October 10, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

राज्यस्तरीय स्पर्धेची तयारी म्हणून खेळाडूंच्या कौशल्याला मिळणार संधी – निलेश मित्तल

छत्रपती संभाजीनगर : टेबल टेनिस क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी! टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे आयोजित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेला नॅशनल ग्लास यांचे प्रायोजन लाभले आहे. या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व वयोगटातील उत्कृष्ट खेळाडू सहभागी होऊन अजिंक्यपदासाठी जोरदार लढत देतील.

वयोगटानुसार स्पर्धा गट
या अजिंक्यपद स्पर्धेत खालील वयोगटांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. त्यात अंडर ११ (मुले व मुली), अंडर १३ (मुले व मुली), अंडर १५ (मुले व मुली), अंडर १७ (मुले व मुली), अंडर १९ (मुले व मुली), पुरुष व महिला गट, ज्येष्ठ गट (४०+, ५०+, ६०+) या गटांचा समावेश आहे. या सर्व गटांमधील सामने विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक टेबल टेनिस हॉलमध्ये आयोजित केले जाणार आहेत.

नोंदणी व सहभाग तपशील

प्रत्येक गटासाठी सहभाग शुल्क प्रति इव्हेंट ५०० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी १५ ऑक्टोबर रात्री ९ वाजेपर्यंत आपली नोंदणी करावी. नोंदणीसाठी राज जैस्वाल, पन्नालाल नगर टेबल टेनिस हॉल, मनोज कानोडजे, विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा यांच्याशी संपर्क साधावा. 

या स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती देताना टीटीएसडब्ल्यूएचे अध्यक्ष निलेश मित्तल म्हणाले की, “ही जिल्हास्तरीय स्पर्धा खेळाडूंना राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करण्यासाठी एक उत्तम संधी ठरेल.” तसेच संघटनेचे सचिव विक्रम डेकेट यांनी सांगितले की, “सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊन आपली तयारी सिद्ध करावी. याच मंचावरून राज्यस्तरावर चमक दाखवण्याची क्षमता विकसित होईल.”

या स्पर्धेद्वारे जिल्ह्यातील तरुण तसेच ज्येष्ठ खेळाडूंना एकत्र आणून टेबल टेनिस खेळाचा प्रसार आणि प्रोत्साहन देण्याचा उद्देश साधला जाणार आहे. गारखेडा क्रीडा संकुलातील ही स्पर्धा क्रीडारसिकांसाठी एक रोमांचक पर्व ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *