
छत्रपती संभाजीनगर : रामपूर आणि गरवारे स्टेडियमवर सुरू असलेल्या स्वर्गीय शेख हबीब मेमोरियल टी-२० क्रिकेट स्पर्धेत आजच्या सामन्यांमध्ये लाईफ लाईन नेरळकर अकॅडमी आणि यंग इलेव्हन या संघांनी दमदार विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. रोमांचक खेळ आणि अष्टपैलू कामगिरीमुळे दोन्ही सामन्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
लाईफ लाईन नेरळकर अकॅडमीचा ७३ धावांनी विजय
रामपूर क्रिकेट स्टेडियमवर सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात लाईफ लाईन नेरळकर अकॅडमी (छत्रपती संभाजीनगर) संघाने युनिव्हर्सल नर्मदा हर संघावर ७३ धावांनी मात केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या लाईफ लाईन संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८२ धावा फटकावल्या. संघाकडून रुद्राक्ष बोडके याने ३७ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ६८ धावा करत प्रभावी खेळी साकारली. त्याला ओंकार राजपूत (३२) आणि शुभम हरकल (२३) यांनीही साथ दिली.
प्रत्युत्तरात युनिव्हर्सल नर्मदा हर संघ निर्धारित षटकांत ७ बाद १०९ धावाच करू शकला. त्यामुळे सामना लाईफ लाईन नेरळकर अकॅडमीने ७३ धावांनी जिंकला.
सामनावीर पुरस्कार रुद्राक्ष बोडके याला त्याच्या नाबाद खेळीबद्दल पंच सुनील बनसोडे आणि आसिफ सिद्दिकी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यंग इलेव्हनचा दमदार विजय
गरवारे स्टेडियम येथे झालेल्या पहिल्या सत्रातील सामन्यात यंग इलेव्हन संघाने लाईफ लाईन विजन मार्बल संघावर सहज विजय मिळवला. नाणेफेक जिंकून यंग इलेव्हन संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लाईफ लाईन विजन मार्बल संघाने प्रथम फलंदाजी करत 19.5 षटकांत सर्वबाद १६२ धावा केल्या. संघाकडून विजय जाधव याने ४७ चेंडूत ८ चौकार व १ षटकारांच्या मदतीने ६७ धावा, तर मानव काटे याने २६ चेंडूत ३२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात यंग इलेव्हन संघाने दमदार फलंदाजी करत केवळ १६.२ षटकांत २ गडी गमावून विजय मिळवला. संघाकडून ऋषिकेश तरडे (३४ धावा), स्वप्निल चव्हाण (४२ चेंडूत ६७ नाबाद धावा – ४ चौकार, २ षटकार) आणि राहुल शर्मा (१५ चेंडूत २७ नाबाद धावा – २ चौकार, २ षटकार) यांनी शानदार खेळी केली.
सामनावीर पुरस्कार स्वप्निल चव्हाण याला त्याच्या अष्टपैलू खेळाबद्दल कर्नल निर्देश शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी आयोजन समितीचे सदस्य संजय डोंगरे, प्रदीप राठोड, विजय अडलाकोंडा, अमोल पगारे, किरण भोळे व प्रमोद उघाडे उपस्थित होते.