
महिला टी २० चॅम्पियनशिप ः सिद्धी नेरकर, सान्या चौरसिया सामनावीर
नागपूर ः महिला टी २० चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये के ४ ब्लास्टर संघाने एनसीए गर्ल्स संघावर रोमांचक लढतीत अवघ्या १५ धावांनी विजय साकारला. दुसऱया सामन्यात रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने माही बटलर संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. या लढतींमध्ये सिद्धी नेरकर आणि सान्या चौरसिया यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

गुरुनानक फार्मसी कॉलेज मैदानावर हे सामने झाले. एनसीए गर्ल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. के ४ ब्लास्टर संघाने प्रथम खेळताना २० षटकात आठ बाद ८८ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना एनसीए गर्ल्स संघ १८ षटकात ६५ धावांत सर्वबाद झाला. कमी धावसंख्येचा हा सामना कमालीचा रोमांचक झाला आणि यात के ४ ब्लास्टर संघ १५ धावांनी विजयी झाला.
या सामन्यात आचल शाहू (३६), डिंपल प्रजापती (१६), रुजुला खराबे (११) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत नित्या तिवारी हिने घातक गोलंदाजी केली. तिने अवघ्या ७ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. गायत्री मोहिते हिने १३ धावांत तीन गडी बाद केले. सिद्धी यादव हिने ५ धावांत दोन विकेट घेतल्या.

माही बटलर टीम पराभूत
दुसरा सामना माही बटलर आणि रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स यांच्यात झाला. हा सामना रॉकेट संघाने नऊ विकेट राखून असा दणदणीत स्वरुपात जिंकला. या सामन्यात माही बटलर संघाने २० षटकात सहा बाद ७५ धावा काढल्या. रॉकेट संघाने १३.१ षटकात एक बाद ७६ धावा फटकावत नऊ विकेटने सामना सहजपणे जिंकला. या लढतीत सान्या चौरसिया ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
या सामन्यात सान्या चौरसिया (३९), प्राची पुरी (३७) व मिताली (२५) यांनी दमदार फलंदाजी केली. गोलंदाजीत दिया भागवत (२-८), अक्षया सुडके (२-१७) आणि नित्या भाटी (१-६) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या.