​राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत जनार्दन टेमकर यांना दोन पदके

  • By admin
  • October 10, 2025
  • 0
  • 236 Views
Spread the love

मुंबई ः व्हेटरन्स स्पोर्ट्स अँड गेम्स नॅशनल फाऊंडेशनतर्फे आयोजित चौथी नॅशनल मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप नुकतीच गुजरातच्या सुरत येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत देशभरातील १३ राज्यांमधील जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला. या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ६० वर्षांवरील वयोगटात जनार्दन टेमककर यांनी आपल्या दोन पदकांच्या झळाळत्या कामगिरीने राज्याचा मान वाढविला.

१०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक
उत्कृष्ट तंत्र आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर जनार्दन टेमकर यांनी १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेतील प्रारंभीच्या फेऱ्यांपासूनच त्यांनी आघाडी घेत आपले वर्चस्व राखले आणि अंतिम फेरीतही अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक
तसेच, त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक जिंकले. या प्रकारात देशभरातील अनुभवी जलतरणपटूंमध्ये तीव्र स्पर्धा होती, तरीही आपल्या अनुभव, फिटनेस आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी तिसरा क्रमांक मिळविला.

स्पर्धेदरम्यान त्यांनी संघटनेचे, प्रशिक्षकांचे आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानले. “वय हा केवळ आकडा आहे; शिस्त, प्रयत्न आणि सकारात्मकता असेल तर कोणत्याही टप्प्यावर नवे लक्ष्य साध्य करता येते,” असे त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले. सदर स्पर्धेतील त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्रातील मास्टर्स जलतरणपटूंना नवे प्रेरणादायी उदाहरण मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *