छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेख संचालनायातील जुन्या कागदपत्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुराभिलेख संचालनालयामार्फत दरवर्षी ऐतिहासिक विषयावर आधारित ऐतिहासिक तसेच दूर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते. इतिहास संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी ही पर्वणीच असते.
यावर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीचे औचित्य साधून पुराभिलेख संचालनालय व छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १३ आणि १४ ऑक्टोंबर या कालावधीत देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीत प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक कागदपत्रे, दस्तऐवज, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार महात्मा गांधी यांचे विविध विषयांवरील दैनिकांमधून प्रसिद्ध झालेले मार्मिक लेख त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विविध कालखंडातील छायाचित्रांचा देखील समावेश असणार आहे. या कागदपत्रामधून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण योगदान तसेच स्वातंत्र्यलढ्यामधील वेळोवेळी पुकारलेल्या समग्र चळवळीचे दर्शन होते.
स्वदेशी चळवळ, मिठाचा सत्याग्रह, ‘ब्रिटिशांनो भारतातून निघून जा’, तसेच भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यासाठी ‘करा अथवा मरा’ हा जो मूलमंत्र दिला होता या व अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा परामर्श घेणाऱ्या कागदपत्रांचा व छायाचित्रांचा समावेश सदर प्रदर्शनात असणार आहे.
यासह प्रजासत्ताक भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रे व छायाचित्रांचा समावेशही सदर प्रदर्शनात असणार आहे. ते उत्तर प्रदेश सरकारचे संसदीय सचिव ते मुख्यमंत्री तसेच पुढील काळात केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग खाते, परिवहन व दळणवळण खाते, पोलीस व वाहतूक खाते, केंद्रीय वाहतूक खाते तसेच रेल्वे खाते या विविध महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी लालबहादूर शास्त्री यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. १९६४ साली लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर भारत-पाक युद्धविराम संबंधी ‘ताश्कंद करार’ हा लालबहादूर शास्त्रींच्या कार्यकाळात झाला होता. या युद्धाच्या दरम्यान भारतीयांना ‘जय जवान जय किसान’ असा मूलमंत्रही त्यांनी दिला होता. अशा अनेक घटनांचा परामर्श घेणाऱ्या कागदपत्रांचा व छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे.
या ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ सोमवारी (१३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रदर्शन १३ व १४ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत देवगिरी महाविद्यालय येथे भरवण्यात येत असून हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. तरी या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी इतिहास प्रेमी नागरिक, संशोधक विद्यार्थी व सामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व सदर प्रदर्शनास सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे आव्हान पुराभिलेख संचालनालाय, महाराष्ट्र राज्याचे संचालक सुजित कुमार उगले व देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी केले आहे.