
धाराशिव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, धाराशिव येथे विभागीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते युवराज निंबाळकर, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, प्राचार्या साधना भोसले, धाराशिव जिल्हा हँडबॉल संघटनेचे सचिव कुलदीप सावंत, आशिष भोसले, लातूर जिल्हा सचिव सुनील सुरकुटे, प्रकाश अवताडे, गुरुनाथ माळी, सचिन मुद्दे, प्रभाकर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना विनोद इज्जपवार म्हणाले की, “हॅण्डबॉल हा केवळ एक खेळ नसून करिअरसह शारीरिक व मानसिक फिटनेस जपण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मोबाईल, टीव्ही किंवा कॉम्प्युटरवरील गेमपेक्षा मैदानावरील खेळ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने शालेय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.”
या विभागीय स्पर्धेत नांदेड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमधून एकूण २७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी पंच म्हणून रणजित शिंदे, यश गायकवाड, यश काशीद, अक्षय काशीद, यश लेंढे, प्रेम जाधव, शुभम जावळे आणि संस्कार हळवे यांनी कार्यभार सांभाळला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कोळगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन मुद्दे यांनी मानले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी योग्य व्यासपीठ ठरल्याचे सर्व मान्यवरांनी नमूद केले.