
विशाखापट्टणम ः महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने आक्रमक फलंदाजी करुन एक नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. तिने एक दिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, टीम इंडियाने स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत शानदार सुरुवात केली. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना दोघांनीही अर्धशतके झळकावली. या डावात मानधना यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण केल्या आणि विश्वविक्रम प्रस्थापित केला.
स्मृती मानधना एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारी आणि डावांच्या आधारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५,००० धावा पूर्ण करणारी फलंदाज ठरली आहे. तिने ११२ डावांमध्ये हा विक्रम केला. यापूर्वी, हा विक्रम स्टेफनी टेलरच्या नावावर होता. तिने १२९ डावांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण केल्या. आता, हा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. यासह, स्मृती एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण फलंदाज बनली आहे. ती एकदिवसीय सामन्यात ५००० धावा करणारी जगातील पाचवी आणि भारताची दुसरी खेळाडू ठरली.
मानधनाने मिताली राजचा विक्रम मोडला
यासह मानधनाने ५० प्लस धावांची खेळी खेळून मिताली राजचा एक मोठा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० डावांमध्ये मानधनाचा ही १० वी ५० प्लस धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी एकदिवसीय सामन्यात ती सर्वाधिक ५० प्लस धावा करणारी फलंदाज बनली आहे. यापूर्वी हा विक्रम मिताली राजच्या नावावर होता. तिने ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध नऊ वेळा ५० प्लस धावा करण्यात यश मिळवले होते.
मानधनाचे शतक हुकले
स्मृती मानधनाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात तिला शतक गाठण्याची संधी होती. परंतु ८० धावांवर ती झेलबाद केली. फोबी लिचफिल्डने सीमारेषेवर एक शानदार झेल घेतला. तिने ६६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार मारत ८० धावा केल्या. मानधनाची आक्रमक फलंदाजी लक्षवेधक ठरली.