
सचिव अशोक तेरकर यांचा विश्वास
नांदेड ः नांदेड जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे क्रिकेटप्रेमींसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर नांदेड प्रीमियर लीगचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेतून नांदेड जिल्ह्यातील अनेक गटातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची व क्रिकेट विश्वात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती सचिव अशोक तेरकर यांनी दिली.
नांदेड प्रीमियर लीग स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंच्या प्रतिभेला योग्य व मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच विविध संघांमधून होत असलेल्या निवडीमुळे तरुणांना प्रोत्साहन तर मिळेलच पण नांदेड जिल्ह्यातील क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार आहे.
नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतलेला हा उपक्रम क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच आदर्शवत ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेड जिल्ह्यामधील क्रिकेटपटूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची नवी दारे खुली होतील असा विश्वास सचिव अशोक तेरकर यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचा सर्वांनी फायदा घ्यावा व या क्रिकेट विश्वात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ माधवराव किन्हाळकर तसेच सचिव अशोक तेरकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.