
मुंबई : बुलढाणा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंनी राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत झळकून राज्याचे नाव अभिमानाने उजळवले आहे. या दोन्ही खेळाडूंची आता राष्ट्रीय स्तरावरील मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मिक्स बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने गोरेगाव (मुंबई) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चिखली तालुक्यातील गोपाल बद्रीनाथ बनसोडे आणि जळगाव जामोद तालुक्यातील चंचल लक्ष्मण फुसे यांनी सुवर्णपदक पटकावत बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला.
गोपाल बनसोडे याने १९ वर्षे वयोगटातील ४६-४८ किलो वजन गटात दमदार कामगिरी करत मुंबई व रायगडच्या प्रतिस्पर्ध्यांना ७-९ अशा फरकाने पराभूत केले. आपल्या छोट्याशा गावातून राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारा गोपाल आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तर चंचल फुसे हिने १७ वर्षांखालील ५२ किलो वजन गटात जबरदस्त लढत देत संभाजीनगर आणि नागपूरच्या खेळाडूंवर मात केली. अंतिम फेरीत ९-१० अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले आणि बुलढाण्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
या विजेत्यांना इंडिया बॉडीचे ग्रॅंडमास्टर राकेश म्हसकर यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मोहिते (रायगड), सचिव नारायण कराळे (अहिल्यानगर), टेक्निकल डायरेक्टर सागर शेलार (पालघर), राजू मोरे (मुंबई), आयोजन समिती अध्यक्ष गणेश पेरे, तसेच विनोद दाढे (नांदेड) आदी मान्यवर उपस्थित होते.
बुलढाणा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मंगेश इटखडे, सचिव वंदना कतोरे, टेक्निकल डायरेक्टर विश्वनाथ शेळके, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महाणकर, हरिष शर्मा आणि प्रमोद येऊल यांनी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
गोपाल आणि चंचल यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, प्रशिक्षक तसेच गणेश पेरे यांना दिले. आता हे दोन्ही खेळाडू राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या वतीने खेळणार असून त्यांच्या यशाबद्दल संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.