
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय आंतर शालेय जलतरण स्पर्धेत मनपा गारखेडा शाळेची जलतरणटू मैथिली उंटवाल हिने सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे मैथिली उंटवाल हिची राज्य शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय शालेय जलतरण स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत अंडर १४ मुलींच्या गटात मैथिली उंटवाल हिने शानदार कामगिरी नोंदवली आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे मैथिली राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रेरणेतून मला खेळू द्या या उपक्रमांतंर्गत या खेळाडूने आपले कौशल्य दाखवले आणि राज्य स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. या घवघवीत यशाबद्दल केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार, मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांनी तिचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक सचिन लव्हेरा यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण विभागाचे उपायुक्त अंकुश पांढरे, क्रीडा अधिकारी संजीव प्रसाद बालय्या, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, समग्र शिक्षण अभियान अधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि शिक्षण अधिकारी भरत तीनगोटे यांनी मैथिली उंटवाल हिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.