
जोधपूर (राजस्थान) : छत्रपती संभाजीनगरची प्रतिभावान लॉन टेनिस खेळाडू सांची संदीप खिल्लारे हिने अंडर-१४ आशियाई लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
ही स्पर्धा जयपूर (राजस्थान) येथील संस्कृती फाऊंडेशन–द ड्रीम हाऊस येथे पार पडत आहे.सांची खिल्लारे ही सध्या द जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, शाळेच्या मुख्याध्यापिका शिखा श्रीवास्तव यांनी तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. प्रशिक्षक महेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपले खेळ कौशल्य अधिकाधिक परिपक्व केला आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी सांची खिल्लारे हिने राष्ट्रीय लॉन टेनिस मालिकेत आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे अंडर-१२ वयोगटात दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवा अभिमान मिळाला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व विभागीय उपसंचालक शेखर पाटील यांनी सांचीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.