
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः अनिल जाधव, सय्यद सादिक सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत डीएफसी श्रावणी संघाने आपली विजयी आगेकूच कायम ठेवत चुरशीच्या सामन्यात यंग इलेव्हन संघाचा २३ धावांनी पराभव केला. दुसऱया सामन्यात झैनब सहारा संघाने साऊथ वेस्ट मल्टीमीडिया संघावर २० धावांनी विजय नोंदवला. या सामन्यांत अनिल जाधव आणि सय्यद सादिक यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. या सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सहा बाद १८९ अशी शानदार धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना यंग ११ संघ २० षटकात आठ बाद १६६ धावा काढू शकला. डीएफसी श्रावणी संघाने चुरशीचा सामना २३ धावांनी जिंकला.
या सामन्यात सूरज गोंड याने आक्रमक फलंदाजी करत २५ चेंडूत ४६ धावा फटकावल्या. सूरजने पाच चौकार व एक षटकार मारला. स्वप्नील चव्हाण याने २५ चेंडूत ४२ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने तीन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. अनिल जाधव याने चार चौकार व दोन टोलेजंग षटकारासह २५ चेंडूत ३७ धावांची दमदार खेळी केली.
गोलंदाजीत अनिल जाधव याने ४५ चेंडूत तीन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. या कामगिरीमुळे अनिल सामनावीर ठरला. सचिन शिंदे याने २६ धावांत दोन गडी बाद केले. ऋषिकेश तरडे याने ३१ धावांत दोन बळी टिपले.
मल्टीमीडिया संघ पराभूत
झैनब सहारा आणि साऊथ वेस्ट मल्टीमीडिया यांच्यातील सामना चुरशीचा झाला. हा सामना झैनब सहारा संघाने २० धावांनी जिंकला. झैनब सहारा क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात सात बाद १५० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना साऊथ वेस्ट मल्टीमीडिया संघ १५ षटकात सहा बाद १३० धावा काढू शकला. त्यांना २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या सामन्यात मिलिंद याने ३८ चेंडूंत ५५ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. मिलिंदने सात चौकार व दोन उत्तुंग षटकार मारले. सय्यद सादिकने १८ चेंडूत ३१ धावा काढल्या. त्यात त्याने पाच चौकार मारले. सलीम शेख याने २३ धावांचे योगदान दिले. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत नदीम पठाण याने १४ धावांत दोन गडी बाद केले. सय्यद सादिक याने २४ धावांत दोन बळी टिपले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सामनावीर पुरस्कार त्याला देण्यात आला. दादासाहेब पाटील याने २९ धावांत दोन बळी घेतले.