फुटबॉल स्पर्धेत सेक्रेड हार्ट ‘ब’, अंधेरीचा दमदार विजय

  • By admin
  • October 14, 2025
  • 0
  • 32 Views
Spread the love

डुएन डिसोझाची हॅटट्रिकने मैदान गाजवले 

मुंबई ः ४५व्या विलिंग्डन कॅथलिक जिमखाना (डब्ल्यूसीजी) रिंक फुटबॉल स्पर्धेत अंधेरीच्या सेक्रेड हार्ट ‘ब’ संघाने आपल्या आक्रमक खेळाने अवर लेडी ऑफ हेल्थ ‘क’, सहारचा ६-२ असा दणदणीत पराभव करून दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.

डब्ल्यूसीजी टेनिस कोर्टवर प्रकाशझोतात रंगलेल्या या सामन्यात डुएन डिसोझाने अप्रतिम खेळ करत हॅटट्रिक गोल नोंदवले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला विरल मंडालिया (२ गोल) आणि मुरुद मोहम्मद (१ गोल) यांनी प्रभावी साथ दिली. पराभूत संघाकडून पासा शेख आणि राहुल चौबे यांनी प्रत्येकी एक गोल करून सन्माननीय झुंज दिली.

होली क्रॉस, कुर्लाने सेंट थॉमस, सांताक्रूझचा ३-२ असा पराभव केला. विजेत्यांसाठी आदित्य शिंदे, प्रणय काणेकर आणि स्वेन सेराव यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर पराभूत संघाकडून शोएब शेख आणि साबीर शेख यांनी प्रत्येकी एक गोल केला.

इन्फंट जीझस, वसईनेही अटीतटीच्या लढतीत माउंट कार्मेल, वांद्रेवर ३-२ असा विजय मिळवला. विजेत्यांसाठी रक्षित पिल्लई, अक्षय चौहान आणि अनिकेत कनोजिया यांनी गोल केले, तर झीशान शेख व नेस्टर मस्करेन्हास यांनी पराभूत संघासाठी गोल केले.

तर पुरुष व्हेटरन्स गटात रॉनीज एससीने सेंट जोसेफ, उमरखाडीचा ७-१ असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरी गाठली. या विजयात ग्लेन मोरेसने चार गोलांची हॅटट्रिकसह शानदार कामगिरी बजावली, तर प्रीतम महाडिक, एडिलबर्ट मार्टिस आणि मेल्विन वाझ यांनी प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून रॉजर गोन्साल्विसने एकमेव गोल केला. स्पर्धेतील सामने जसजसे पुढे सरकत आहेत, तसतसा रिंक फुटबॉलचा रोमांच मुंबईकर क्रीडाप्रेमींना अक्षरशः मोहून टाकत आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *