
पुणे ः फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण व क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोविंद मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत गोविंद चषक २० वर्षाखालील लेदर बॉल टी २० क्रिकेट स्पर्धेत विविध शहरातील ९ संघानी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल फलटण या ठिकाणी १८ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे.
या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक अशोक गाडगीळ यांनी सांगितले की, या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले. याप्रसंगी दताबापु अनपट, माजी. सदस्य जिल्हा परिषद सातारा, महादेवराव माने, संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि दतात्रये मोहिते हे उपस्थित होते.
स्पर्धेत क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्स फलटण, सातारा जिल्हा क्रिकेट संघटना, आर्यन क्रिकेट अकादमी, अष्टपैलू स्टार्स, अष्टपैलू झोराष्ट्रीयन्स, चॅम्पियन्स क्रिकेट अकादमी, पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकादमी खेड शिवापूर, प्रोफेशनल क्रिकेट अकादमी सातारा, चौघुले क्रिकेट अकादमी सांगली या ९ संघानी आपला सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेतील सहभागी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेता संघाला करंडक व ३१ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व २१ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर सामनावीर यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आले असून यामध्ये अशोक गाडगीळ, दशरत नाईक निंबाळकर, अवि कांबळे, प्रवीण जाधव आणि बाबासाहेब गंगावणे यांचा समावेश आहे