 
            जुन्नर ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉ वसंत यशवंत गावडे यांना २०२५ या वर्षीचा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल ऑनर ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. युनिव्हर्सल रिसर्च ग्राउंड यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
डॉ गावडे हे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल ऑनर अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आला. डॉ गावडे यांनी युवकांसाठी अनेक व्याख्यानांद्वारे समाज प्रबोधनाचे काम केले आहे. विविध विषयांवरील चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा या मधील सक्रिय सहभाग व यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राबविलेले उपक्रम, वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून केलेले नाविन्य पूर्ण प्रयोग, अनेक शोधनिबंधांचे प्रकाशन, अनेक विषयांवर वर्तमानपत्रातून लेखन, गोरगरीब व वंचित घटकांसाठी केलेली मदत तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे अधोरेखित होतो.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड संदीप कदम, खजिनदार अॅड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव (प्रशासन) ए एम जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे, उपप्राचार्य डॉ के डी सोनावणे व डॉ रमेश शिरसाट सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय सेवक यांच्या वतीने डॉ गावडे यांचे अभिनंदन करण्यात आले.



