
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चार विद्यार्थ्यांची निवड
हिंगोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली आणि छत्रपती शिवाजी विद्यालय, दांडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर विभागीय धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा स्पर्धा १७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत जेईएस महाविद्यालय जालना येथील धनुर्धारी खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवून जेईएस महाविद्यालयाचा मान उंचावला आहे. मागील १५ वर्षांपासून धनुर्विद्या या खेळात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि दर्जेदार खेळाडू घडवणारे संस्थान म्हणून जेईएस महाविद्यालय, जालना यांचे नाव राज्यभरात आदराने घेतले जाते. महाविद्यालयातील धनुर्विद्या प्रशिक्षण क्रीडा संचालक डॉ हेमंत वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे दिले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अनेक विद्यार्थी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये पदक जिंकत आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ सदावर्ते, पी सी बाफना, सुमंत बिक्कड, डॉ राजेंद्र सोनवणे, तसेच धनुर्विद्या प्रशिक्षक व क्रीडा संचालक डॉ हेमंत वर्मा आणि क्रीडा शिक्षक राहुल सारस्वत उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिरंदाजी प्रशिक्षक अशोक जंगमे यांनीही पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
१९ वर्षांखालील इंडियन राऊंड (मुले) : युवराज बोधले (प्रथम क्रमांक), श्रेयस गट्टे (तृतीय क्रमांक).
१९ वर्षांखालील कंपाऊंड राऊंड (मुली) : हिमांशी दुसेजा (द्वितीय क्रमांक), जानवी श्रोत्रीय (तृतीय क्रमांक).