
ओंकार परदेशी व कार्तिकी मिसाळला सुवर्णपदके, महाराष्ट्र संघात निवड
बीड ः छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पार पडलेल्याराज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या चॅम्पियन्स अकॅडमी आणि बीड जिल्हा संघटनेच्या १० खेळाडूंनी पदके जिंकली आहेत. राष्ट्रीय खेळाडू ओंकार परदेशी व कार्तिकी मिसाळ यांनी सुवर्णपदके जिंकली व त्यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे अशी माहिती तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी दिली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे यावर्षीची राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा १४, १७ व १९ वर्षे वयोगटात पार पडली.
या स्पर्धेत ओंकार परदेशी व कार्तिकी मिसाळ यांनी २ सुवर्णपदके जिंकली व त्यांची राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कल्याणी घुगे व समर्थ आंधळे यांनी २ रौप्यपदके पटकावली. यशस्वी चव्हाण, स्वराज घोडके, यश चव्हाण, श्रावणी आठवले, सुमित राऊत व साक्षी केकाण यांनी ६ कांस्यपदके पटकावली आहेत.
या सर्व खेळाडूंचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या हस्ते करण्यात आला. विजेते खेळाडू हे बीड जिल्हा क्रीडा संकुलातील डॉ अविनाश बारगजे यांच्या चॅम्पियन्स तायक्वांदो अकॅडमीचे खेळाडू आहेत. डॉ अविनाश बारगजे व जया बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघ प्रशिक्षक म्हणून शेख अनिस, देवेंद्र जोशी, ऋत्विक तांदळे, नितीन आंधळे व बाळासाहेब आंधळे यांनी काम पाहिले.
या सर्व खेळाडूंना जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक डॉ योगेश क्षीरसागर, डॉ सारिकाताई क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, हुसुरकर, राठोड, जितू आराक, योगेश करांडे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, डॉ अविनाश बारगजे, जया बारगजे, बन्सी राऊत, भरत पांचाळ, डॉ विनोदचंद्र पवार, मनेश बनकर, सुनील राऊत, प्रसाद साहू, बालाजी कराड यांच्यासह जिल्हा संघटनेच्या सर्व वरिष्ठ खेळाडू अधिकारी, सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.