
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सचिवपदासाठी नामदेव शिरगावकर आणि संजय शेटे यांच्यात लढत


मुंबई ः महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील शिखर संस्था महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक मोठी चुरशीची होत आहे. देशातील क्रीडा क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर राजकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता लागलेली आहे. दुसरीकडे नामदेव शिरगावकर आणि संजय शेटे यांच्यात सरचिटणीपदाची निवडणूक देखील लक्षवेधी ठरत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रथमच अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. अजितदादा पवार हे मार्च २०१३ पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीने अध्यक्षपदाची निवडणूक प्रथमच देशात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरही अध्यक्षपदासाठी अजित पवार व मुरलीधर मोहोळ यांचे अर्ज कायम राहिल्याने मोठी उत्कंठा या निवडणुकीची लागलेली आहे.

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढत
या निवडणुकीत क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दोन्ही नेत्यांचे क्रीडाक्षेत्राशी घनिष्ठ संबंध असून, राज्यातील क्रीडा विकास, निधी वितरण, आणि संघटनात्मक प्रभाव यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ संघटनात्मक नसून, राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. राज्य सरकारमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पातळ्यांवर प्रतिनिधित्व करणारे हे दोन नेते आता क्रीडा संघटनेच्या नेतृत्वासाठी थेट समोरासमोर आल्याने, क्रीडा प्रशासनावरही नव्या समीकरणांची छाया पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव
क्रीडा संघटनांवर राजकीय प्रभाव नवा नाही; मात्र यावेळी थेट राज्य आणि केंद्र सरकारमधील प्रतिनिधी समोरासमोर आल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. क्रीडा क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय, निधी वितरण, आणि संघटनात्मक ताकद या सर्वांचा ताळमेळ राखण्यासाठी या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या २०२५-२०२९ या कार्यकाळासाठीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन फॉर्म मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतरची अंतिम उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह ही यादी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील दादर येथे प्रसिद्ध करण्यात आली.
अंतिम यादीप्रमाणे विविध पदांसाठी उमेदवार स्पर्धेत आहेत
अध्यक्ष पदासाठी – अजित पवार (महाराष्ट्र खो-खो असोसिएशन) आणि मुरलीधर मोहोळ (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ).
वरिष्ठ उपाध्यक्ष – अशोक पंडित (महाराष्ट्र रायफल असोसिएशन) आणि संदीप जोशी (महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन).
उपाध्यक्ष पदासाठी – आदिल सुमारीवाला (महाराष्ट्र अॅऍथलेटिक्स असोसिएशन), दयानंद कुमार (महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट असोसिएशन), प्रदीप गांधी (महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँड कयाकिंग), प्रशांत देशपांडे (महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन).
सचिवपदासाठी – संजय शेटे (महाराष्ट्र अॅमेच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन) आणि नामदेव शिरगावकर (मॉडर्न पेन्टाथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र).
संयुक्त सचिवपदासाठी – निलेश जगताप (महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन), शैलेश टिळक (महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन), उदय डोंगरे (महाराष्ट्र फेंसिंग असोसिएशन), मनोज भोरे (हॉकी महाराष्ट्र) आणि चंद्रजीत जाधव (महाराष्ट्र खो-खो असोसिएशन).
खजिनदार पदासाठी – स्मिता यादव (महाराष्ट्र रोईंग असोसिएशन) आणि अरुण लखानी (महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन).
कार्यकारिणी सदस्य पदासाठी – संदीप चौधरी (रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र), माधर रंधीर सिंग (हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र), संदीप ओंबासे (तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र), राजेंद्र निंबाळते (महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन), गिरीश फडणीस (याटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र). किरण चौगुले (वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन), समीर मुणगेकर (महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अँड कयाकिंग), दत्तात्रय आफळे (महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन), सिद्धार्थ पाटील (महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन), संदीप भोंडवे (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ), राजीव देसाई (महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन), गोविंद मुथुकुमार (महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल असोसिएशन), प्रदीप खांडरे (महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट असोसिएशन), संजय वळवी (महाराष्ट्र रोईंग असोसिएशन), आशिष बोडस (महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशन), सोपान कटके (ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन).
ही निवडणूक महाराष्ट्रातील विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यामधून पुढील चार वर्षांसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नवी कार्यकारिणी निश्चित होणार आहे. ही निवडणूक येत्या २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.