
पर्थ ः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळून रोहितने एक मोठा टप्पा गाठला. खरं तर, हा रोहितचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्यामुळे तो इतके सामने खेळणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला.
रोहित शर्मापूर्वी फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांनी ५०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यात रोहित लवकर बाद झाला. साहजिकच त्याचे चाहते मोठे निराश झाले.
गिलने धोनीचा विक्रम मोडला
गिलने पर्थमध्ये फलंदाजीने फारसे काही केले नसेल, पण मैदानावर पाऊल ठेवताच त्याने एक ऐतिहासिक कामगिरी केली. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर गिलने पहिल्यांदाच एकदिवसीय कर्णधार म्हणून मैदानात उतरले तेव्हा त्याने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
शुभमन गिल आता तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) भारताचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे. त्याने २६ वर्षे ४१ दिवसांच्या वयात हा विक्रम साध्य करून धोनीला मागे टाकले. धोनीने २६ वर्षे २७९ दिवसांच्या वयात तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवले. या यादीत वीरेंद्र सेहवाग २८ वर्षे ४३ दिवसांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नितीश रेड्डीचे पदार्पण
या सामन्यात भारताकडून अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर ऑस्ट्रेलियानेही दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली. ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉ आणि मिशेल ओवेन यांनी पदार्पण केले. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाज आणि तेवढेच अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या सामन्यात मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता.