
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकॅडमीचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू लक्ष्यजीत ठाकरे याने नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या एसएसके रॅपिड चेस टूर्नामेंट २०२५ मध्ये आपली प्रतिभा सिध्द करत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या स्पर्धेत लक्ष्यजीतने उत्कृष्ट एकाग्रता, रणनीती आणि शांत खेळ सादर करत अंडर-११ वयोगटात ४.५/७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने दबावाखाली स्थिर मनाने खेळ करत अनेक निर्णायक डाव विजयात रूपांतरित केले, जे त्याच्या खेळातील परिपक्वतेचे द्योतक आहे.
स्पर्धेतील या प्रभावी कामगिरीबद्दल व्हिक्टोरियस चेस अकॅडमीतर्फे लक्ष्यजीतचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. अकॅडमीचे प्रशिक्षक म्हणाले की, लक्ष्यजीत हा सातत्य, संयम आणि योजनाबद्ध खेळाचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यात भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मोठी क्षमता आहे.
या विजयामुळे अकॅडमीचा अभिमान अधिक वाढला असून सर्वांनी लक्ष्यजीतला आगामी स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.