
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकॅडमीची प्रतिभावान विद्यार्थिनी राध्या मल्होत्रा हिने नुकत्याच पार पडलेल्या १७०० पेक्षा कमी फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप – पंजाब स्टेट अॅमॅच्योर २०२५ स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महिला गटातील तीव्र स्पर्धेत राध्याने उत्कृष्ट रणनीती, एकाग्रता आणि संयम दाखवत ४.५/७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. तिच्या डावपेचांमधून बुद्धिबळातील सखोल समज, परिस्थितीनुसार खेळ बदलण्याची क्षमता आणि वाढता आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला.स्पर्धेतील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व्हिक्टोरियस चेस अकॅडमीतर्फे राध्याचे अभिनंदन करण्यात आले.
अकॅडमीचे प्रशिक्षक म्हणाले की, “राध्या ही सातत्याने प्रगती करणारी खेळाडू आहे. तिच्या शांत आणि विश्लेषणात्मक खेळामुळे ती भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच यश संपादन करेल.”
या यशामुळे अकॅडमीचा अभिमान अधिक वाढला असून सर्वांनी राध्याला आगामी स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.