
तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला
छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल येथे नुकतेच राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्रुती राजपूत आणि आराध्या जाधव यांनी चमकदार कामगिरी नोंदवत शाळेचा नावलौकिक वाढवला.

या स्पर्धेत संस्कार इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती राजपूत हिने मुलींच्या १४ वर्षांखालील गटात आणि संस्कार प्राथमिक विद्यालयाची आराध्या जाधव हिने १७ वर्षांखालील गटात उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. दोघींच्या या यशामुळे शाळेचा आणि जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे.
स्पर्धेत दोघींनी उत्तम तंत्र, वेग आणि निर्धाराचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. त्यांच्या या कामगिरीमुळे संस्कार विद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक यशस्वी अध्याय जोडला गेला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश देसले, सचिव लीना देसले, मुख्याध्यापिका सिद्धिकी राहत कौसर, तसेच गोपाल सुरडकर, सुषमा जोशी, सतीश तायडे, संगीता काळे, ज्योती तळेले आणि क्रीडा विभाग प्रमुख अरुण भोसले पाटील यांनी श्रुती व आराध्या यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच क्रीडा शिक्षक विश्वजित मासरे, संकेत मदने, जावेद पठाण, अनुप बोराळकर यांनी दोघींना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.