
सांघिक सुवर्णपदका बरोबर वैयक्तिक स्पर्धेत राज्य अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब
ठाणे ः ठाणे महापलिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेच्या युवा बॅडमिंटनपटूंचा समावेश असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या १९ वर्षांखालील ज्युनियर मुलांच्या बॅडमिंटन संघाने वसई येथील सांघिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना सुवर्णपदकावर नाव कोरले.
पालघर जिल्ह्यातील वसई येथील विद्याविकासिनी बॅडमिंटन संकुलात नुकत्याच पार पडलेल्या या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या सर्वेश यादव, ओम गवंडी, तनय जोशी, सानिध्य एकाडे, अर्जुन बिराजदार, आर्यन बिराजदार व विनय पाटील या खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत या संघाने सर्वप्रथम अहिल्यानगर च्या संघाचा २-० असा पराभव केला. त्या पुढच्या फेरीत मुंबईउपनगर विरुद्ध देखिल २-० असा एकतर्फी विजय नोंदवला.
उपान्त्य फेरीत ठाण्याच्या ज्युनियर मुलांनी तर कमालच केली ! त्यांनी बलाढ्य पुणे संघाचा २-० असा सनसनाटी पराभव करून एकच खळबळ उडवून दिली. उपांत्य फेरीत एकेरीच्या पहिल्या सामन्यात ठाण्याच्या विनय पाटील याने पुण्याच्या यशराज कदम याचा १३-२१, २१-१३, २१-१९ अशा गुणांनी विजय नोंदवला. तर दुहेरीच्या लढतीत आर्यन आणि अर्जुन बिराजदार या जुळ्या भावांनी पुण्याच्या क्रिष्णा जासुजा व श्लोक डागा यांचा २२-२०, २१-०९ असा दोन गेम मध्ये पराभव करून आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले.
अंतिम फेरीत ठाण्याची गाठ पडली ती नागपूर संघाची ! याही संघावर २-० अशी अटीतटीच्या लढतीत ठाण्याने अजिंक्य पदावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीच्या लढतीत ठाण्याच्या सर्वेश यादव याने नागपूरच्या प्रणय गाडेवार याचा २२-२०, ०९-२१, २१-१३ असा पराभव करून ठाण्याच्या संघाला एक शून्य अशी बढत मिळवून दिली आणि पाठोपाठच्या दुहेरीच्या लढतीत पुन्हा एकदा बिराजदार बंधूंनी ठाणे संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलत नागपूरच्या जीवा राधाक्रिष्णनन पिल्लई व प्रणय सुशांत गाडेवार यांचा १५-२१, २१-०७, २१-१० असा तीन सेटमध्ये पराभव केला व ठाण्याच्या संघाला विजय मिळवून दिला. अशा तऱ्हेने ठाणे संघाने या स्पर्धेत आपले प्रभुत्व प्रस्थापित केले.
वैयक्तिक गटातील खुल्या स्पर्धेत देखील ओम गवंडी आणि सानिध्य एकाडे यांनी निधीश मोरे आणि मल्हार घाडी यांचा अंतिम फेरीत १९-२१,२१-११,२१-०७ असा पराभव केला आणि सुवर्ण पदक पटकावले. मात्र ओम गवंडीला मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत निधीश मोरे व प्रांजल शिंदे यांच्याकडून १५-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला व रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच मुलींच्या गटातही ईशा पाटील हिने कांस्य पदक मिळवले. तिचा उपांत्य फेरीत काव्या रांका (पुणे) हिच्याकडून २०-२२, १९-२१ अशा अत्यंत अटीतटीच्या लढतीत निसटता पराभव झाला.
अशा तऱ्हेने ठाणेकरांनी स्पर्धेत सर्व गटात आपली छाप टाकली व दोन सुवर्ण पदके, एक रौप्य आणि एक ब्राँझ पदक पटकावत ठाणे महाराष्ट्रात अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. ठाणे अकॅडमीचे प्रमुख श्रीकांत वाड यांनी सर्व खेळाडूंचे तसेच संघाबरोबर गेलेले प्रशिक्षक अक्षय देवलकर, मयुर घाटणेकर, तसेच अमित गोडबोले व इतर सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.