आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला नवी दिशा 

  • By admin
  • October 21, 2025
  • 0
  • 193 Views
Spread the love

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धा उत्साहाचा माहोल

  • रवी भांदककार, गडचिरोली

महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेला आदिवासी समाज पारंपरिक जीवनपद्धतीसह जगत असला, तरी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणावर झेप घेत आहे. १९७२ साली शासनाने आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवासी आश्रम शाळांची संकल्पना राबवली. त्यानंतर १९७५ पासून विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य आणि शारीरिक क्षमतेचा विकास व्हावा या हेतूने आदिवासी विकास विभागाने क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा कल केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता खेळांकडे वाढला.

आज या शाळांमध्ये प्रशिक्षित क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, शासकीय मान्यतेसह विविध स्तरांवर – बिट केंद्र, प्रकल्प, विभाग व राज्य स्तरावर – क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. विशेष म्हणजे, या स्पर्धांमधून राज्यस्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना १०वी व १२वीच्या परीक्षेत ग्रेस गुणांची सुविधा तसेच भविष्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये २ ते ५ टक्के आरक्षण देण्यात येते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याची संधी निर्माण झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा क्रीडा उत्सव सुरू!

गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तिन्ही प्रकल्पांतून दीड हजारांहून अधिक विद्यार्थी या वर्षीच्या राज्यस्तरीय निवडीसाठी सज्ज झाले आहेत. दिवाळी सुट्टीनंतर हे सामने रंगणार असून, त्यासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात अहेरी प्रकल्पस्तरीय स्पर्धा : ७, ८ व ९ नोव्हेंबर, भामरागड प्रकल्पस्तरीय स्पर्धा : १४, १५ व १६ नोव्हेंबर, गडचिरोली प्रकल्पस्तरीय स्पर्धा : १६, १७ व १८ नोव्हेंबर या स्पर्धांचा समावेश आहे. तसेच यानंतर ५ डिसेंबर २०२५ रोजी विभागस्तरीय व २६ डिसेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या २९ ऑगस्ट २०२५ च्या परिपत्रकात नमूद आहे.

खेळांचा जल्लोष आणि विद्यार्थ्यांचा उत्साह
या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, ४x१०० आणि ४x४०० मीटर रिले यांसारखे सांघिक खेळ तसेच धावणे, थ्रोइंग, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक आदी वैयक्तिक प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी मिळते.

“जय आदिवासी, जय जोहार!”
या घोषवाक्याने सारा परिसर दुमदुमला असून, विद्यार्थी खेळात उत्साहाने सहभागी होत आहेत. पालक व शिक्षक यांच्या मते, या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व घडण्यास मोठी मदत होते.

आदिवासी कर्मयोगी अभियान पुरस्काराने गडचिरोली गौरवान्वित
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभागांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्ली येथे ‘आदिवासी कर्मयोगी अभियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान जिल्हाधिकारी अविनाश पांडा, अहेरी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, तसेच गडचिरोली व भामरागड प्रकल्प अधिकारी यांना देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, या गौरवामुळे येथील आदिवासी विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात उंच भरारी घेण्याचा आत्मविश्वास आता या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील या क्रीडा स्पर्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिद्द, कौशल्य आणि प्रगतीचे प्रतीक ठरत आहेत आणि त्यातूनच उदयास येत आहे नव्या, सबळ आणि आत्मनिर्भर आदिवासी भारताचे स्वप्न!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *