जलतरण साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा

  • By admin
  • October 21, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

जलतरण साक्षरता मिशनचे संकल्पक राजेश भोसले यांचे आवाहन

दीपावली म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतिक म्हणून आपण सर्व भारतीय मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करतो. असाच जलतरण साक्षरतेचा दीपोत्सव आपल्याला या वर्षी पासून आपापल्या घरी साजरा करावयचा आहे. कारण जलतरण साक्षरतेच्या अभावी ७०० ते ८०० कुलदीपक दररोज पाण्यात बुडून विझतात असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणणे आहे.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातील जलतरणा विषयीचे असलेले अज्ञान दूर करण्यासाठी “जलतरण साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा” असे कळकळीचे आवाहन जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे राजेश भोसले यांनी सर्व विद्यार्थी – पालक व नागरिकांना केली आहे. कारण प्रश्न हा आपल्या सुरक्षित जीवनाचा व आजीवन कामी पडणाऱ्या जीवन कौशल्याचा आहे .

आपल्या पौराणिक व आध्यात्मिक मान्यतेनुसार वसुबारस – गाय जिच्यामुळे आपले अस्तित्व अबाधित आहे तिची पूजा दिवा लावून करतो. धनत्रयोदशी – धन व आरोग्य मिळावे म्हणून पूजा दिवा लावून करतो. नरक चतुर्दशी – नकारात्मकतेचा नाश व धैर्य वाढावे म्हणून पूजा दिवा लावून करतो. दीपावली – धन व आयुष्यात शांती लाभावी म्हणून पूजा दिवा लावून करतो. गोवर्धन पूजा – निसर्गाचे आभार, धर्म म्हणजे कर्तव्य व स्थिरता लाभावी म्हणून पूजा दिवा लावून करतो. भाऊबीज – नातेसंबंध वृद्धिंगत व्हावेत म्हणून पूजा दिवा लावून करतो.

विशेष सांगायचे म्हणजे आपण सर्व भारतीय वर्ष भर जे काही सण आणि उत्सव साजरे करतो ते बहुतांश पौर्णिमा किंवा इतर दिवशी साजरे करतो जसे की हनुमान जयंती – चैत्र पौर्णिमा, बुद्ध जयंती – वैशाख पौर्णिमा, वट सावित्री – जेष्ठ पौर्णिमा, गुरू पूजन – आषाढ पौर्णिमा, चातुर्मास समाप्ती – भाद्रपद पौर्णिमा, कोजागिरी – अश्विन पौर्णिमा, त्रिपुरारी – कार्तिक पौर्णिमा, दत्त जयंती – मार्गर्शिष पौर्णिमा, दान पुण्य – पौष पौर्णिमा, पूण्य स्नान – माघ पौर्णिमा, होळी – धुलिवंदन – फाल्गुन पौर्णिमा असे एक नव्हे तर असंख्य सणवार व उत्सव हे पौर्णिमेलाच साजरे केले जातात.
पण दीपावली हा एकमेव सण आहे जो अमावस्येला आपण सर्व जण साजरे करतो आणि ते पण दिवे लावून. कारण एकच आहे की आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचा अंधार दूर व्हावा व ज्ञानाच्या प्रकाशाने आपले जीवन उजळून निघावे. आनंदमय व सुखमय व्हावे. त्याच प्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील जलतरणा विषयी असलेले अज्ञान दूर करण्यासाठी जलतरण साक्षरतेचे पाच दिवे आपल्याला आपली भावी पिढी सुरक्षित व सुद्ढ ठेवण्यासाठी लावावयाचे आहेत.

पहिला दिवा – माहितीचा, दुसरा दिवा – मार्गदर्शनाचा, तिसरा दिवा – समुपदेशनाचा, चौथा दिवा – शिक्षणाचा, पाचवा दिवा – प्रशिक्षणाचा… असे दिवे लावून जर आपण सर्वांनी दीपावली साजरी केली तर या पुढे कुणाच्याही घरचा दिवा
अपघाती पाण्यात बुडून विझणार नाही.

दिवाळी असल्या कारणाने सर्वच शैक्षणिक संस्था जसे शाळा – महाविद्यालयांना किमान १८ ते २० दिवसांच्या सुट्या लागलेल्या आहेत. त्यातल्या त्यात या वर्षी सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे मानवी वसतीच्यां आस-पास असणारे छोटे – मोठे, कृत्रिम व नैसर्गिक असे सर्वच प्रकारचे जलस्त्रोत काठोकाठ भरलेले आहेत. नदी – नाले – ओढे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहत आहेत. तलाव – सरोवर – बंधारे – डोह – खदाणी इत्यादी ओव्हर फ्लो झालेले आहेत. आड – विहिर – बारव यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे.

अतिरिक्त पावसामुळे निसर्ग चोही बाजूने बहरून आला आहे. त्यात दिवाळीच्या सुट्ट्या लागून पाच – सहा दिवसाची दिवाळी संपली की पुढील सुट्ट्यांचे जोरदार नियोजन केले जाते. कुणी आपल्या गावी तर कुणी मामांच्या तर कुणी पर्यटन स्थळी जाणाचा पक्का बेत आखत आसतात. अशा ठिकाणी असणारी निसर्गरम्य जलस्त्रोत आकर्षणाची केंद्र बनतात. त्यांचा आनंद घेत असताना आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना – मुला मुलींना वेळीच धोकादायक जलस्त्रोतांविषयी जागृत करणे आवश्यक आहे. म्हणूनच दिवाळी दरम्यान प्रतिकात्मक “जलतरण साक्षरतेचा दिवा आपापल्या घरी लावून जागृती करणे गरजेचे आहे. जलतरण साक्षरतेबद्दल अधिक माहिती घ्यावयाची असल्यास अभियान प्रमुख म्हणून कार्यरत अंजूषा मगर (77768 44398), पौर्णिमा भोसले (9699944712), विजय भोसले (9226345600) यांच्याशी संपर्क साधावा.

शुभ दीपावली !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *