कोल्हापूर मनपा शालेय अंडर १९ मुलींच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
कोल्हापूर ः कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर क्रिकेट अंपायर असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित मनपास्तर आंतरशालेय १९ वर्षाखालील मुलींची क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात मेरी वेदर मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेत श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि उपायुक्त डी सी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजनात क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शिवाजी कामते व सरदार पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
अंतिम सामन्यात श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोल्हापूर या संघाने महावीर महाविद्यालयावर एकतर्फी विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले.
महावीर कॉलेजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ६ षटकांत ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्री साई हायस्कूलच्या मुलींनी अवघ्या ४ षटकांत ३७ धावा करत दमदार विजय मिळवला.
याआधीच्या सामन्यात श्री साई हायस्कूलने चाटे स्कूल व ज्युनिअर कॉलेजवर एकतर्फी विजय मिळवला होता. त्या सामन्यात कर्णधार परिनिता पाटील हिने १९ धावा तर मयुरी थोरात हिने १६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
सेमी फायनल सामन्यात महावीर कॉलेजने कमला कॉलेजवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले.
अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मयुरी थोरात हिला सामनावीर तर परिणिता पाटील हिला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. संघातील प्राची पाटील, तन्वी खळदकर, जान्हवी चौगुले, निसर्गा महाजन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विजेता संघ
परिणिता पाटील (कर्णधार), समिक्षा पाटील (उपकर्णधार), मयुरी थोरात, निसर्गा महाजन, सई वेल्हाळ, समिधा चौगुले, तन्वी खळदकर, सुहानी कहांडळ, जान्हवी चौगुले, सोनल माने, सोनाक्षी खाडे, ऋतुजा कांबळे, प्रज्ञा पाटील, प्राची पाटील, पूजा कोकरे व सानिका नाईक.
विजयी संघाचे विशेष अभिनंदन करताना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंगराव बोंद्रे, प्राचार्या एम एस पाटील, क्रीडा शिक्षिका वर्षाराणी पाटील, सरदार पाटील, विनायक पवार, दिवाकर पाटील आणि सौम्यलता बिराजदार यांनी संघाचे मनापासून कौतुक केले.
या स्पर्धेतून कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणींच्या क्रीडा क्षमतेला एक नवा मंच मिळाला असून, महिला क्रिकेट क्षेत्रात कोल्हापूरचा दबदबा पुन्हा अधोरेखित झाला आहे.



