छत्रपती संभाजीनगर ः बीड येथील बलभीम महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत एमआयटी, छत्रपती संभाजीनगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एमआयटी संघाच्या वीरेंद्र विश्वास क्षीरसागर, यश विजयकुमार जयस्वाल, अभिषेक अशोकराव मुकणे, सिद्धांत शुद्धोधन वाघमारे आणि श्रीनिवास संजय सत्वधर यांनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेतील सामने अत्यंत रोमांचक होते. पहिल्या सामन्यात एमआयटीने बलभीम कॉलेज, बीड यांना ३-० ने पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, छत्रपती संभाजीनगर विरुद्ध ३-१ ने विजय मिळवला.
उपांत्य फेरीत बद्रीनारायण बारवले कॉलेज, जालना यांच्यावर ३-२ ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात एमआयटीने देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर विरोधात १-३ ने पराभव पत्करला, तरीही संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले. एमआयटी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन खेळाडूंना लाभले आहे.
या घवघवीत यशाबद्दल एमआयटी समूहाचे महासंचालक प्रा मुनीश शर्मा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ निलेश पाटील, डॉ बाबासाहेब सोनवणे, डॉ अमित रावते आणि विलास त्रिभुवन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



