महाराष्ट्र कुस्ती संमेलनचा आगळा उपक्रम

  • By admin
  • October 26, 2025
  • 0
  • 116 Views
Spread the love

– सुहास जोशी, ज्येष्ठ क्रीडा‌ पत्रकार.

पल्याकडे‌ साहित्य संमेलन, विज्ञान संमेलन, नाट्य संमेलन, कवी संमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात. पण कुस्ती संमेलनाचे देखील राज्यात गेली तीन वर्ष शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी क्रीडा‌ प्रेमींना असेल. फलटण‌‌ येथील कुस्ती मित्र, कुस्तीवर प्रचंड प्रेम करणारे‌, कुस्ती वेडे‌ वस्ताद संपतराव जाधव हे आपल्या सुजन फाऊंडेशनच्या माध्यमातून या महाराष्ट्र कुस्ती संमेलनाचे आयोजन करत आहेत. 

सुमारे सहा दशकांपेक्षा जास्त काळ या खेळात कार्यरत असलेल्या संपतराव जाधव यांनी हा खेळ महाराष्ट्रात जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आणि त्याचा योग्य प्रकारे प्रचार, प्रसार करण्यासाठी हे कुस्ती संमेलनाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. प्रत्यक्ष कुस्ती सांगण्यासाठी आणि कुस्तीचे प्रबोधन योग्यरित्या करण्यात आपण कमी पडत असल्याची बाब जाधव यांच्या लक्षात आली. त्यामुळेच जाधव यांनी हा संमेलनाचा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. 

पहिले संमेलन फलटण‌‌ येथे २०२३ मध्ये झाले. त्यानंतर दुसरे संमेलन सातारा येथे २०२४ मध्ये संपन्न झाले. तर तिसरे संमेलन नुकतेच यंदा पुन्हा फलटण‌‌ येथे आयोजित करण्यात आले होते. १९६५ साली छोट्या गावातून‌ संपतराव जाधव यांनी कुस्तीचा श्री गणेशा सातारा येथील हनुमान व्यायाम मंडळातून केला. सुरुवातीला गावा-गावात होणाऱ्या जत्रांमधील कुस्ती सामन्यात त्यांनी आपली ताकद अजमावली. त्याच जोरावर जाधव यांना सातारा, भुईंज येथील सातारा सहकारी साखर कारखान्यात काम मिळाले. त्यामुळे त्यांच्या कुस्तीला मोठी चालना मिळाली. 

“कामगार साखर श्री” किताब जिंकण्याचा पराक्रम जाधव यांनी केला. शहरी भागात ग्रामीण भागातील कुस्तीपटूंची फारशी दखल घेत नाही हे जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मर्यादा ओळखुन आपल्या पंचक्रोशीत नाव कमवायचे याची खुणगाठ मनाशी पक्की करुन‌ टाकली. कुस्ती खेळासाठी आपल्या कुवतीनुसार जे काही करता येईल ते मात्र अखंडपणे करत राहयाचा जणू काही ध्यासच त्यांनी घेतला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. आठ-दहा कुस्ती मैदाने त्यांनी घेतली.

२०१५-१६ मध्ये महाराष्ट्र कुस्ती उपक्रम संपतराव जाधव यांनी हाती घेतला. त्या उपक्रमातून त्यांनी विविध तालमींना भेटी दिल्या. तेथे कुस्ती खेळाला पुढे नेण्याकरिता काय काय करता येईल याबाबत अनेकांशी संवाद साधला. नवोदित पैलवानांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज युवा पैलवानांसमोर अनंत अडचणी उभ्या असल्याचे त्यांना जाणवले. त्यावर काही तोडगा काढण्यासाठी या खेळातील अनेक दिग्गजांशी सल्लामसलत‌ केली. नवी प्रतिज्ञा सुरू केली. ही प्रतिज्ञा सर्व तालमीत म्हणावी यासाठी संपतराव जाधव यांनी आग्रह धरला. विविध तालमीत होणाऱ्या प्रार्थना त्यांनी समजून घेतल्या. शंभरपेक्षा जास्त तालमींना या उपक्रमा अंतर्गत जाधव यांनी भेटी दिल्या. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. २० डिसेबर २०१९ मध्ये शाहुपुरी तालमीत महाराष्ट्राचे पहिले‌ हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचा १५० पैलवानांच्या उपस्थितीत सुजन फाऊंडेशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५० पेक्षा जास्त खेळाडूंना सुजन फाऊंडेशनतर्फे गौरविण्यात आले. 

या यशस्वी सत्कार समारंभानंतर त्याच वेळी कुस्ती संमेलनाची कल्पना जाधव यांना सुचली. या खेळाडूंचा कौतुक सोहळा आपण करू शकतो तर मग संमेलनाचे आयोजन देखील आपण करू शकतो असा विश्वास जाधव यांना मिळाला. मग त्यातूनच संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. पहिल्या संमेलनाला दोनशे जणांची उपस्थिती लाभली. तर ‌तिसऱ्या संमेलनाला हिच कुस्ती प्रेमींची उपस्थिती पाचशेच्या‌ देखील पुढे गेली. कुठलीही सरकारी मदत न घेता लोक वर्गणीच्या माध्यमातून सुजन फाऊंडेशन हा संमेलनाचा उपक्रम राबवत आहे ‌ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. जो तो कुस्ती प्रेमी आपल्याला जमेल तशी मदत या संमेलनासाठी करतो. सर्व कुस्ती प्रेमींची भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाते. माता-भगिनींचा उचित गौरव केला जातो. इतरत्र त्यांची फारशी दखल कोण घेत नाही. पण संमेलनात त्यांची योग्य ती दखल घेतली जाते. कारण कुस्तीपटू‌ंच्या जडण घडणीत माता-भगिंनींचा मोठा‌‌ वाटा आहेच. त्यांना‌ आदर्श माता‌‌ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 

संपतराव जाधव यांना ‌हे संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांचे चिरंजीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अजितकुमार जाधव, राष्ट्रीय कुस्तीपटू मनोहर आडके, महापौर केसरी रवींद्र काकडे, मारुती माळी, सुधाकर माने, रामहरी वहिल, आयुष शेख, शुभांगी  डोके यांचे मोलाचे सहकार्य‌ मिळत आहे. २००६ साली संपतराव जाधव यांनी सुजन फाऊंडेशनची स्थापना केली. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच या संमेलनाचा आनंद घेतात. संमेलनात होणारे‌ कुस्तीचे सामने हे देखील खास आकर्षण असते. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, ठाणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, धुळे येथील कुस्तीपटूंचा सहभाग या सामन्यात असतो. विजेत्यांना पाच मानाच्या गदा‌ दिल्या जातात. तसेच ढाली देखील देण्यात येतात. त्याच बरोबर सन्मान पत्र, लंगोट,पदक, स्टीलचा दुधाचा ग्लास देऊन या पैलवानांना गौरविण्यात येते. दिवसभर कुस्तीशी निगडीत असे विविध कार्यक्रम संमेलनात राबवले जातात. कुस्ती सामने, या खेळात भरीव योगदान देणाऱ्या मंडळीचा गौरव, त्यांचे मार्गदर्शन, युवा पैलवानांना, नवे डावपेच, नवे तंत्र, आधुनिक कुस्तीची माहिती संमेलनात करुन‌ दिली जाते.

ऑलिम्पिक वीर : पै खाशाबा जाधव, कराड, पहिले हिंदकेसरी, पै श्रीपती खंचनाळे, कोल्हापूर, हिंद केसरी पै मारुती माने, कवठेपिरान जि सांगली.

ऑलिम्पिक वीर : पै श्रीरंग जाधव, सातारा, पै शंकरराव मदने, डिस्कळ, जि सातारा यांना मरणोतर पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पै नजरुद्दीन नायकवडी, इस्लामपूर, जि सांगली, पै सचिन बनकर, निमगांव, जि पुणे, पै महालिंग खांडेकर, म्हसवड, जि सातारा, पै वसंतराव पाटील, मिरा भाईंदर, जि ठाणे, पै संपतराव जाधव, आदर्की, जि सातारा, पै मारूती माळी, रेंदाळ, जि कोल्हापूर, पै तानाजी घोरपडे, कोरेगांव, जि सातारा, पै पांडुरंग शिंदे, इंदापूर, जिल्हा, पुणे, पै जाकिर भाई मणेर, फलटण, जिल्हा सातारा, पै रविंद्र काकडे, आदर्की जिल्हा सातारा, क्रीडा प्रशिक्षक, आष्टी, जि बीड, महाराष्ट्र कुस्ती संमेलन.

पुरस्कार मानकरी : पै आयुब शेख आरणगांव, जिल्हा अहिल्यानगर, पै विष्णु आदनाक, क्रीडा शिक्षक आष्टी, जि बीड, पै परशुराम लोंढे,  क्रीडा शिक्षक सांगली, पै पूजा पाटील क्रीडा शिक्षक मिरज जिल्हा सांगली, पै प्रतीक्षा सुतार, क्रीडा शिक्षक मुळशी, जिल्हा पुणे यांना देखील या कुस्ती संमेलनात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच आतापर्यंत १०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनींचा संमेलनात उचित गौरव करण्यात आला. त्याचबरोबर इतर खेळातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “क्रीडावीर सन्मान” पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीची देखील दखल घेतली जाते. आदर्श माता-भगिनींना शाल, मानचिन्ह, गौरवपत्र देण्यात येते. तर राष्ट्रीय खलिफा पुरस्कार प्राप्त विजेत्यांना मैदानी फेटा, मानाचा तुरा, मानचिन्ह, गौरव चिन्ह, प्रतिज्ञा प्रती, सन्मानपत्र, लंगोट, शिट्टी, शिवबंधन, खलिफा पट्टा, शाहू शेला दिला जातो. येणाऱ्या भावी काळात या महाराष्ट्र कुस्ती संमेलनाची व्याप्ती आणखी नक्कीच वाढेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *