बजाजनगर वाळूज महानगरासाठी स्वतंत्र क्रीडा संकुलाची मागणी

  • By admin
  • October 26, 2025
  • 0
  • 112 Views
Spread the love

बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर : विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत आयोजित “युवा आणि क्रीडा संवाद” या कार्यक्रमात बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे बजाजनगर–वाळूज महानगर भागासाठी स्वतंत्र क्रीडा संकुल उभारण्याची मागणी करण्यात आली. हा संवाद कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात पार पडला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड माणिकराव कोकाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. कैलास जाधव, सचिव शफी शेख, कोषाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, संचालक करण लगाने, समाधान हराळ, ओमप्रकाश वाघमारे, रामेश्वर वैद्य, दत्ता पवार, प्रा. नारायण शिंदे, कृष्णा पवार, विद्याभूषण कलावंत, अनिल शेरे, अजित जाधव, अक्षय सरकटे, संदीप माघाडे, आशिष स्वर्णकार आदींसह विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, पालक, तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू उपस्थित होते.

फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बजाजनगर–वाळूज औद्योगिक परिसर व पंचक्रोशी भागात गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक शाळा व महाविद्यालये असूनही खेळाडूंना सरावासाठी आवश्यक असे दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध नाही. त्यामुळे खेळाडूंना योग्य सुविधा न मिळाल्याने त्यांची प्रतिभा दडपली जाते.

गेल्या १५ वर्षांपासून बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे विविध खेळाडू घडवण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. या परिसरातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झालेले असून, शासनाने योग्य सुविधा दिल्यास भविष्यात ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता या परिसरात आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रा कैलास जाधव यांनी सांगितले की, “बजाजनगर वाळूज परिसरात स्वतंत्र क्रीडा संकुल उभारले गेले तर खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल. आम्ही सर्व शिक्षक व क्रीडाप्रेमी शासनाकडून लवकरात लवकर या मागणीची पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.”

कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी फाउंडेशनच्या मागणीची दखल घेत ‘राज्य शासन क्रीडा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ठोस पावले उचलेल’ असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *