क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशल वर्क कॉलेजचा हृदयस्पर्शी पुढाकार
धाराशिव ः धाराशिव तालुक्यातील तेर गावावर आलेल्या भीषण पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यात मंगेश जगताप, प्रथमेश आगाशे, अमृता शिंदे, ज्ञानेश्वर इंगळे आणि आरती पेठे या विद्यार्थ्यांच्या घरांचा समावेश आहे. त्यांच्या घरांची पडझड होऊन सर्व कुटुंब उघड्यावर आले असून, त्यांच्या शिक्षणाचे स्वप्न पाण्यात वाहून जाण्याच्या संकटात सापडले आहे.
अशा काळोख्या प्रसंगी, त्यांच्या जीवनात आशेचा किरण ठरले – क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशल वर्क कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ महेश राजेनिंबाळकर आणि सचिव कुलदीप सावंत. या दोघांनी मानवी संवेदनांचा अद्भुत परिचय देत केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीचा हात दिला. त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक जीवनावश्यक साहित्य घरपोच दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली.
या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे बारावीनंतरचे बीएसडब्ल्यू शिक्षण कॉलेज प्रशासनाने पूर्णपणे आपल्या जबाबदारीवर घेतले आहे. “हे विद्यार्थी शिकून मोठे व्हावेत, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना पुन्हा उभारी मिळावी, हीच माझी खरी लोकसेवा आहे,” असे डॉ महेश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे आणि शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देणे – हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सिद्ध करून, डॉ महेश राजेनिंबाळकर व कुलदीप सावंत यांनी संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाभिमुख नेतृत्वाचे जिवंत उदाहरण निर्माण केले आहे. पूराच्या संकटात जेव्हा अनेक स्वप्नं उद्ध्वस्त झाली, तेव्हा हाच मानवीतेचा दीप त्यांच्या आयुष्यात उजळून निघाला आणि शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू झाला.



