छत्रपती संभाजीनगर ः सबरागामुवा विद्यापीठ, बालंगोडा, श्रीलंका येथील क्रीडा विज्ञान व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने हिक्काडुवा येथे ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अप्लाइड क्रीडा परिषदेसाठी डॉ संदीप जगन्नाथ जगताप यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
डॉ संदीप जगताप हे फुलंब्री येथील श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मलेशिया, मॉरिशस, थायलंड, दक्षिण कोरिया, नेपाळ, जपान, व्हिएतनाम अशा विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत “प्राचीन भारतीय क्रीडा संस्कृती” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत.
संदीप जगताप यांनी आजपर्यंत विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदांमध्ये ५६ संशोधन निबंध प्रकाशित केले असून, त्यांच्या नावावर क्रीडा क्षेत्रातील १२ पुस्तके आणि चार पेटंट्स नोंदवलेली आहेत. श्रीलंकेत होणाऱ्या या परिषदेत डॉ. जगताप “भारत आणि श्रीलंकेतील प्राचीन खेळांच्या सांस्कृतिक महत्त्वावर तुलनात्मक अभ्यास” या विषयावर संशोधन पेपर सादर करणार आहेत.
या निवडीबद्दल पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, संस्थेचे उपाध्यक्ष देवजीभाई पटेल, सचिव निवृत्ती पाटील गावंडे, संचालक प्राचार्य डॉ सर्जेराव ठोंबरे, पालक संचालक प्राचार्य डॉ प्रदीप जब्दे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष टकले, उपप्राचार्य डॉ पांडुरंग कल्याणकर, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ जगताप यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


