ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी भारताला धक्का
नवी मुंबई ः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार सलामीवीर प्रतीका रावल हिला दुखापत झाली आहे. नवी मुंबई येथे बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात प्रतिकाला झेल घेताना दुखापत झाली आणि तिला मैदान सोडावे लागले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रतिकाच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे, त्यात म्हटले आहे की, “टीम इंडियाची अष्टपैलू प्रतिका रावलला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना गुडघा आणि घोट्याला दुखापत झाली. बीसीसीआयची वैद्यकीय टीम तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
भारताची २५ वर्षीय स्टार फलंदाज प्रतीका २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांमध्ये तिने ३०८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक आहे. या बाबतीत स्मृती मानधना आघाडीवर आहे, तिने आतापर्यंत ३५० धावा केल्या आहेत. ३० ऑक्टोबर रोजी भारताचा उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी प्रतीकाची दुखापत ही चिंतेचे कारण आहे.
एलिसा हिली दुखापतग्रस्त
महिला विश्वचषक उपांत्य सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का बसू शकतो. संघाची कर्णधार एलिसा हिली भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. हिली २२ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकली. हिलीला पायाच्या दुखापतीमुळे संघाच्या दोन सामन्यांमध्ये खेळता आले नाही आणि आता तिचा उपांत्य फेरीत सहभाग आणखी कठीण झाला आहे.बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर सराव सत्रात हिलीला दुखापत झाली. हिली विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, तिने भारत आणि बांगलादेशविरुद्ध शतके झळकावली आहेत.



