२ नोव्हेंबरला वेगवान थरार
ठाणे : ठाणे जिल्हा अॅमेच्युअर सायकलिंग असोसिएशन व खेलो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (२ नोव्हेंबर) कल्याण येथे जिल्हास्तरीय महिला सायकलिंग लीग स्पर्धा रंगणार आहे. जिल्ह्यातील महिला सायकलपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि राष्ट्रीय पातळीवर संधी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
ही स्पर्धा तीन वयोगटांत आयोजित करण्यात आली आहे. महिला इलीट (२००७ पूर्वी जन्मलेल्या), महिला ज्युनियर (२००८ ते २०१० दरम्यान जन्मलेल्या) आणि महिला सब ज्युनियर (२०११ नंतर जन्मलेल्या). प्रत्येक गटात स्पर्धकांना स्वतंत्र अंतरावर सायकलिंग करावे लागणार असून विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
महिलांच्या सायकलिंग खेळाला प्रोत्साहन देण्याच्या आणि नवोदित सायकलपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने खेळो इंडिया यांच्या उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला सायकलिंग लीगचे आयोजन होत असल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या स्पर्धेच्या आयोजनात राष्ट्रीय सायकलिंग महासंघ, खेलो इंडिया, आणि ठाणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांचा समन्वय असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला सायकलपटू यात सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी ९ वाजता होणार असून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. जिल्ह्यातील नागरिक, क्रीडा प्रेमी आणि विद्यार्थ्यांना या स्पर्धेला उपस्थित राहून महिला सायकलपटूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेचे संयोजक ठाणे जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव डॉ यज्ञेश्वर बागराव असून, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून सुधाम रोकडे स्पर्धेचे निरीक्षक म्हणून जबाबदारी बघणार आहेत.
महिला सायकलिंग क्षेत्रातील ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



