मुंबई : समाजकार्य, सहकार, शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सोनाई फाऊंडेशन, मुंबई तर्फे प्रदान करण्यात येणारा वसंतसागर पुरस्कार यंदा गुरुवर्य वसंतराव पाटील यांना प्रदान करण्यात आला.
नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, वाशी येथे २६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या भव्य पुरस्कार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्त सेवा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आनंदराव माईंगडे हे होते. यावेळी सहाय्यक विक्रीकर आयुक्त किरण जाधव, राष्ट्रीय नेमबाज नमिता पाटील, प्रसिद्ध उद्योजक रामदास शिंगारे (युनिटी इंडस्ट्रीज), सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी नायकवडी आणि चरण गावचे सरपंच विशाल नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुवर्य वसंतराव पाटील यांना कुस्ती या पारंपरिक खेळाच्या जतन आणि प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मिरा भाईंदर महानगरपालिका आणि श्री गणेश आखाडा यांच्या माध्यमातून कुस्तीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे युवा पिढीला नवी दिशा मिळाली आहे, असे गौरवोद्गार यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले.
या कार्यक्रमादरम्यान ‘यशवंत नीति’ या दिवाळी अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. सामाजिक भान आणि क्रीडाप्रेम जपणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांनी वसंतराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.
या मानाच्या सन्मानाबद्दल श्री गणेश आखाडा परिवार, समस्त मिरा भाईंदरवासी आणि अंत्री बुद्रुक ग्रामस्थांतर्फे गुरुवर्य वसंतराव पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे कुस्ती आणि पारंपरिक क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



