बुद्धी कौशल्याच्या खेळासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची – गोखले

  • By admin
  • October 27, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

मुंबई ः शारीरिक तंदुरुस्तीच्या खेळाडूंबरोबर बुद्धी कौशल्याच्या खेळाडूंसाठी देखील शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊनच प्रत्येक खेळाडूने नियमित व्यायाम करण्याची आवश्यकता असते असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी सांगितले.

महानगरी वार्ताहर या मासिकाने दिवाळीनिमित्त प्रकाशित केलेल्या क्रीडा साधना या दिवाळी अंकाचे प्रकाशन गोखले यांच्या हस्ते व प्रबोधन संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या अंकाचे मुख्य संपादक व संचालक सतीश सिन्नरकर, अतिथी संपादक डॉ मिलिंद ढमढेरे, आंतरराष्ट्रीय डायव्हिंग पटू ऋतिका श्रीराम, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट मानसी सुर्वे, लेखकांपैकी गिरीश पोटफोडे, अंजोर गाडगीळ, तसेच प्रबोधनचे माजी अध्यक्ष मनोहर अदवानकर, विजय नाडकर्णी, माजी पोलीस अधिकारी पुरू गावंडे, लेखक संतोष खाड्ये, प्रबोधन संस्थेचे खोखो व कबड्डीपटू शशांक कामत,नारायण वाडदेकर व विद्या वाडदेकर हे उपस्थित होते.

क्रीडा साधना या अंकाविषयी गोखले म्हणाले, या अंकामधील सर्वच लेख अतिशय वाचनीय आहेत आणि या लेखाची मांडणी सुरेख झाली आहे. अतिशय बारकाईने अभ्यास करून लेखांची निवड केली आहे. क्रीडा क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले भाऊसाहेब पडसलगीकर, हरिभाऊ साने, राम भागवत यांच्यावरील लेखाद्वारे युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.‌

महानगरी वार्ताहर हे नियतकालिक प्रत्येक वेळी एखादा विषय घेऊन त्यावर आधारित दिवाळी अंक प्रकाशित करीत असतात. यंदा त्यांनी क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेला अंक प्रकाशित केला आहे याबद्दल सिन्नरकर व ढमढेरे यांच्याबरोबर त्यांच्या सर्वच सहकार्यांचे आणि लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा अंक क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकाने संग्रही ठेवला पाहिजे असे देसाई यांनी सांगितले. शुभदा सिन्नरकर यांनी सादर केलेल्या गणेशवंदना व पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *