नागपूर: महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर तथा रायफल शुटींग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धेचे आयोजन ऑरेंज सिटी स्पोर्टस शुटींग क्लब, ए डी बी ए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, केटीआर नागपूर येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे यजमानपद नागपूर जिल्ह्यास प्राप्त झाले असून २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत १४, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील एकूण ९ विभागांतून ज्यात नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर आणि क्रीडा प्रबोधिनी यांचा समावेश आहे, असे एकूण ४८६ खेळाडू तसेच ५४ संघ व्यवस्थापक सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेकरीता खेळाडू मुले आणि मुलींची निवास व भोजन व्यवस्था एन ए एफ एस फायर अॅन्ड सेफ्टी कॉलेज, झोन क्र १०१, अद्याली फाटा, विहीरगाव, उमरेड रोड, नागपूर येथे करण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळा
सोमवारी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूरचे प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्पर्धा निरीक्षक श्रद्धा नालमवार (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी), अजित पाटील, सचिन चव्हाण, संदीप तरटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक होत्या. ऑरेंज सिटी स्पोर्टस शुटींग क्लब, नागपूरचे सचिव अनिल पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑलम्पिक कांस्य पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले.
पहिल्या दिवशी एअर पिस्टल प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अर्णव वघारे याने सुवर्णपदक जिंकले. या गटात सिराज पारखी (पुणे) याने रौप्यपदक आणि अभंग चिकने (नाशिक) याने कांस्यपदक पटकावले.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात एअर पिस्टल प्रकारात मुंबईच्या प्रांजना केसरकर हिने सुवर्णपदक पटकावले. मुंबईच्या नायरा केदार हिने रौप्यपदकाची कमाई केली. पुण्याच्या रिया धनवडे हिने कांस्य पदक संपादन केले.



