नाशिकच्या भूमिकेची ऐतिहासिक कामगिरी

  • By admin
  • October 28, 2025
  • 0
  • 70 Views
Spread the love

आशियाई स्पर्धेत रौप्य व कांस्य पदकाची कमाई

नाशिक ः बहरीन येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत नाशिकची धावपटू भूमिका नेहेते हिने डबल धमाका केला आहे. या स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशी दोन पदके जिंकून तिने स्पर्धा गाजवली आहे. तिच्या शानदार कामगिरीमुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.

तिसरी युथ गेम्स स्पर्धा बहरीन येथे सुरू आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या संघामध्ये नाशिकच्या भूमिका नेहते हिची २०० मीटर धावणे आणि ४ बाय १०० मीटर धावणे रिले या दोन प्रकारात भारतातर्फे निवड झाली आहे. ही निवड सार्थ ठरवत भूमिका नेहेते हिने २०० मीटर धावणे प्रकारात वेगवान धाव घेत हे अंतर २४.४३ सेकंदामध्ये पूर्ण करून कांस्य पदक मिळविले. तर मिडले रिले या प्रकारात भूमिका हिने रौप्य पदकाला गवसणी घालत दुहेरी यश संपादन करून नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मनाचा तुरा खोवला.

मिडले रिले प्रकारात भूमिका हिने आपल्या सहकारी एडविना जेसन, शौर्या अंबुरे आणि तन्नू यांच्या साथीने वेगवान धाव घेत हे आंतर २. १२. ०० मिनिटात पूर्ण करून रजत पदकावर आपले नांव कोरले.

नाशिकच्या अॅथलेटिक्स खेळाडूंनी आत्तापर्यंत लांब पल्ल्याच्या शर्यतीत देशाचे प्रतिनिधित्व करून चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु शॉर्ट डिस्टन्स म्हणजे कमी अंतराच्या २०० मीटर प्रकारात भारताला मेडल मिळवून देणारी भूमिका नेहते ही नाशिकची पहिली खेळाडू ठरली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कमी अंतराच्या स्पर्धेतही नाशिकचे धावपटू कमी नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे.

याआधी भूमिका नेहते हिने भुवनेश्वर येथे ४० व्या कनिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेत अशीच धाव घेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण पात्र आहोत हे सिद्ध केले होते. तसेच पाटणा येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्येही भूमिकाने २०० मीटर धावणे प्रकारात पहिला क्रमांक मिळविला होता. भूमिका नेहते ही गेल्या पाच वर्षांपासून एनआयएस प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे नियमित सराव करत आहे. भूमिकाच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे नाशिकच्या धावपटूंमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे. भूमिकांसह येथे सराव करत असलेले आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशीच चांगली कामगिरी करून नाशिकचा झेंडा जगामध्ये उंच करतील असा विश्वास सिद्धार्थ वाघ यांनी व्यक्त केला. भूमिका नेहतेच्या या उत्तम कामगिरीबद्दल क्रीडा मंत्र्यांचे ओएसडी रवींद्र नाईक, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी यांनी तिचे अभिनंदन केले. खेळाडूंना अशी कामगिरी करता यावी यासाठी संघटना कायमच सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्न्यांमुळे यापुढेही नाशिकची अशीच प्रगती दिसून येईल असेही यावेळी हेमंत पांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *