– प्रा. प्रशांत शिंदे, क्रीडा शिक्षक, एमकेडी इंग्लिश मीडियम स्कूल, नंदुरबार

आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाचा अर्थ फक्त “पाठ्यपुस्तकातील ज्ञान” इतकाच राहिला आहे. गुण, रँक, आणि स्पर्धा या धावपळीत आपण एक गोष्ट विसरत आहोत – शिक्षणाचं खरं ध्येय केवळ बुद्धीचा विकास नाही, तर शरीर, मन आणि चारित्र्य यांचा समतोल विकास आहे. आणि हा समतोल साधतो तो विषय म्हणजे – शारीरिक शिक्षण
“खेळ” हा विषय नाही, ती जीवनशाळा आहे
खेळ विद्यार्थ्याला फक्त व्यायाम शिकवत नाही, तर शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, आणि पराभव स्वीकारण्याची ताकद शिकवतो. मैदानात विद्यार्थी पडतो, उठतो, पुन्हा प्रयत्न करतो आणि तिथेच आयुष्याचा खरा धडा शिकतो.
पण दुर्दैवाने आज अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असूनही त्यांना योग्य महत्त्व दिलं जात नाही. त्यांच्या वर्गांना “फ्री तास” म्हणून बघितलं जातं, खेळाचे तास कमी केले जातात, आणि विद्यार्थ्यांना मैदानाऐवजी वर्गातच बसवलं जातं.
शिक्षणाचा पाया फक्त पुस्तकावर नाही
शारीरिक शिक्षणाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. कारण शरीराशिवाय बुद्धी कार्य करू शकत नाही. वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे की नियमित व्यायाम केल्याने मेंदू सक्रिय राहतो, स्मरणशक्ती वाढते, आणि एकाग्रता टिकते. म्हणूनच जो विद्यार्थी खेळात नियमित असतो, तो अभ्यासातही उजवा ठरतो. परंतु पालक आणि काही शिक्षक “खेळ म्हणजे वेळ वाया घालवणं” असा गैरसमज करून घेतात. खरं तर खेळ म्हणजे विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास.
क्रीडा शिक्षक – शाळेचा आरोग्यरक्षक
क्रीडा शिक्षक हा फक्त “खेळ शिकवणारा” शिक्षक नाही, तर आरोग्य, पोषण, स्वच्छता, आणि मानसिक तंदुरुस्तीचा मार्गदर्शक आहे. तो विद्यार्थ्यांना केवळ धावायला शिकवत नाही, तर आयुष्य जिंकायला शिकवतो. पण अनेक शाळांमध्ये या शिक्षकांना “साइड टीचर” समजलं जातं. शैक्षणिक निकालांच्या चमकदार स्पर्धेत त्यांचे योगदान दुर्लक्षित राहते. ज्या शाळेत क्रीडा शिक्षकांचा सन्मान होत नाही, ती शाळा विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्टीने कधीच प्रगती करू शकत नाही. क्रीडा शिक्षकांना मिळणारा दर्जा का कमी? शैक्षणिक निकालांमध्ये टक्केवारी दिसते, पण विद्यार्थ्यांचं आरोग्य, आत्मविश्वास, आणि चारित्र्य या गोष्टी मोजल्या जात नाहीत. म्हणूनच शारीरिक शिक्षणाला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं जातं. क्रीडा शिक्षक वर्गात नसल्यास प्रश्न विचारले जातात, पण इतर विषयाचे शिक्षक नसले तरीही कोणी विचारत नाही ही वास्तव स्थिती आहे. यावरून स्पष्ट होतं की आपल्या शिक्षण व्यवस्थेत अजूनही “शरीर आणि आरोग्य” यांना हवी तितकी प्राधान्यक्रम मिळालेली नाही.
सरकार, संस्था आणि पालकांची जबाबदारी
राष्ट्रीय शिक्षण धोरणात “ क्रीडा आणि शारीरिक शिक्षण” हा शिक्षणाचा आवश्यक घटक म्हणून नमूद केला आहे. मात्र प्रत्यक्षात काही संस्था फक्त नावापुरते तास दाखवतात. सरकारने प्रत्येक शाळेत प्रशिक्षित क्रीडा शिक्षकांची नेमणूक सक्तीने करावी, तसेच संस्थांनी या शिक्षकांना तितकाच सन्मान द्यावा जितका इतर विषय शिक्षकांना दिला जातो. पालकांनीही आपल्या मुलांना मैदानात उतरवावं – कारण आरोग्यदायी शरीरातच यशस्वी मेंदू वसतो.
शारीरिक शिक्षण – मानसिक आणि सामाजिक विकासाचं मूळ
खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजात मिसळतो, नियम पाळतो, संघभावना शिकतो. तो पराभव स्वीकारायला शिकतो आणि पुन्हा प्रयत्न करतो हेच आयुष्याचं खरं शिक्षण आहे. आज सोशल मीडियाने आणि मोबाईलने मुलांना स्थिर केलं आहे; त्यातून बाहेर काढण्याचं काम क्रीडा शिक्षक आणि मैदानच करू शकतात.
शारीरिक शिक्षण नसलेली शाळा म्हणजे अर्धं शिक्षण हे वाक्य केवळ घोषवाक्य नाही, ती वास्तव स्थिती आहे. ज्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांना महत्त्व दिलं जातं, तिथे विद्यार्थी फक्त हुशारच नाही, तर आरोग्यदायी, आत्मविश्वासी आणि सशक्त होतो. शारीरिक शिक्षणाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे – कारण शरीर घडल्याशिवाय मन घडत नाही, आणि मन घडल्याशिवाय शिक्षण फुलत नाही.म्हणूनच आज प्रत्येक शाळेने, प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक समाजाने हा प्रश्न स्वतःला विचारावा “आपल्या शाळेत क्रीडा शिक्षक आहे का? आणि असेल तर आपण त्याला खरं महत्त्व देतो का?” कारण ज्या दिवशी क्रीडा शिक्षकाचा सन्मान होईल, त्या दिवशी शिक्षण खर्या अर्थाने पूर्ण होईल.



