पवन घुगे यांची क्रीडा मंत्र्यांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर ः विकसित महाराष्ट्र २०४७ या संकल्पनेअंतर्गत आयोजित युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमात राज्यातील युवा व क्रीडा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी विविध स्तरांवरील समस्या व अडचणींचा आढावा घेण्यात आला. या संवाद कार्यक्रमात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत बुडो मार्शल आर्ट्स ॲमॅच्युअर असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर चे जिल्हा क्रीडा प्रशिक्षक व जिल्हा संघटक पवन घुगे यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
पवन घुगे यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी मार्शल आर्ट्सद्वारे स्वसंरक्षण प्रशिक्षण बंधनकारक करण्याची मागणी केली. तसेच या प्रशिक्षणासाठी पात्र मार्शल आर्ट्स क्रीडा प्रशिक्षकांना अधिकृत प्रशिक्षण देणे व नियुक्तीची तरतूद करावी, अशीही सूचना त्यांनी केली.
पवन घुगे यांनी पुढे सांगितले की, बुडो मार्शल आर्ट हा जागतिक स्तरावर लोकप्रिय आणि शिस्त, आत्मविश्वास तसेच शारीरिक तंदुरुस्ती वाढविणारा खेळ असून, या खेळाला शालेय पातळीवर मान्यता देऊन खेळाडूंना ग्रेस गुणांची सुविधा द्यावी, अशीही मागणी त्यांनी क्रीडामंत्र्यांकडे केली.
पवन घुगे, प्रवीण घुगे, राधा घुगे आणि नंदा घुगे हे गेल्या २०-२५ वर्षांपासून ग्रामीण भागातील मुला-मुलींना शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन स्वसंरक्षण प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी यशोधन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मिशन मार्शल आर्ट्स, वूशू कुंग फू स्पोर्ट कराटे असोसिएशन आणि बेल्ट रेसलिंग संघटना यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असून, क्रीडा संस्कृती ग्रामीण भागात रुजवण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
या कार्यक्रमात क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, माजी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि प्रशिक्षक उपस्थित होते. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी या सूचनांची दखल घेत राज्यातील क्रीडा व युवा धोरणात त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.



