जलतरण साक्षरतेचे प्रेरणास्त्रोत : गुरुवर्य अंकुशराव कदम

  • By admin
  • October 28, 2025
  • 0
  • 128 Views
Spread the love

“दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती”

लेखक : राजेश भोसले

शिक्षण, समाजसेवा आणि क्रीडा यांचा त्रिवेणी संगम

महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक तेजस्वी व्यक्तिमत्वांनी कार्य केले आहे, पण शिक्षण, समाजसेवा आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधणारे एकच नाव ठळकपणे पुढे येते – गुरुवर्य अंकुशराव कदम, एमजीएम (महात्मा गांधी मिशन) संस्थांचे सर्वेसर्वा. त्यांच्या कार्यातून “सेवा हीच साधना” हा जीवनमंत्र प्रत्यक्षात उतरलेला दिसतो. त्यांनी आपल्या दूरदृष्टी, समर्पण आणि व्यवस्थापन कौशल्यातून शिक्षणसंस्था केवळ ज्ञानकेंद्र नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा बनवल्या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील नवनिर्मितीची वाटचाल

अंकुशराव कदम यांनी शिक्षणात नाविन्य आणि मूल्यांचा संगम साधला.
एमजीएम संस्थांमधून त्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण, संशोधनावर आधारित अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची संस्कृती रुजवली.

शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या शैक्षणिक पद्धती, आणि विद्यार्थ्यांसाठी जीवनकौशल्य व नेतृत्वविकास कार्यशाळा यामुळे एमजीएमला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली. त्यांचा ठाम विश्वास आहे की, “शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नव्हे, तर व्यक्तिमत्व विकासासाठी असते.”

क्रीडा क्षेत्रातील प्रेरणा आणि प्रोत्साहन

क्रीडा क्षेत्रात अंकुशराव कदम यांनी दाखवलेली समर्पणाची भावना उल्लेखनीय आहे. त्यांच्या मते, “क्रीडा ही जीवनशाळा आहे, जिथे शिस्त, आरोग्य, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते.”

त्यांच्या नेतृत्वाखाली एमजीएममध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिरे, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. विशेष म्हणजे, ग्रामीण विद्यार्थी, मुली आणि विशेष गरजा असलेल्या खेळाडूंना समान संधी देण्यावर त्यांनी नेहमी भर दिला. त्यांच्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थी केवळ खेळाडूच नाही, तर सजग नागरिक बनले आहेत.

समाजसेवेतील समर्पण आणि संवेदना

अंकुशराव कदम यांची समाजसेवा ही नुसती दानशूरतेची कृती नाही, तर संवेदनशील व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर त्यांनी अनेक उपक्रम राबवले.

प्रौढ साक्षरता मोहिमा, रोजगारनिर्मिती प्रशिक्षण केंद्रे आणि आरोग्य जागरूकता अभियान हे त्यांच्या कार्याचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या दृष्टीने समाजसेवा म्हणजे संस्थात्मक जबाबदारी नव्हे, तर संस्कारांची परंपरा आहे.

जलतरण साक्षरतेचा जागतिक प्रवास – एक अद्वितीय प्रेरणा

मी (लेखक राजेश भोसले) मागील २५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे जलतरण साक्षरता अभियान राबवत आहे. या काळात अनेक अधिकाऱ्यांनी या कार्याचे कौतुक केले; पण जेव्हा ही संकल्पना गुरुवर्य अंकुशराव कदम सरांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्या पहिल्याच वाक्याने या कार्याला नवीन दिशा मिळाली – “हे काम जागतिक स्तरावर झाले पाहिजे. जलतरण साक्षरतेचा संदेश जगभर पोहोचावा, ही माझी इच्छा आहे.” त्या एका वाक्याने माझ्या कार्याला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी आणि कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी एमजीएमच्या वतीने सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

याच प्रेरणेने १५ जून २०२३ रोजी एमजीएम विद्यापीठाच्या जलतरण तलावावर पहिला जागतिक जलतरण साक्षरता दिन साजरा करण्यात आला.

 ३६ तास सलग जलतरण – जनजागृतीचा नवा इतिहास

या दिवशी सलग ३६ तास अखंड जलतरण करून समाजाला एक अर्थपूर्ण संदेश देण्यात आला – “पाणी कुणालाही बुडवत नाही; जेव्हा पोहता येत नाही, तेव्हाच आपण बुडतो.”

ही कृती केवळ प्रतीक नव्हती, तर जगभरात जलतरण साक्षरतेचा प्रसार करण्याचा एक प्रभावी उपक्रम ठरला. एमजीएमच्या माध्यमातून या मोहिमेला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप लाभले आहे.

भारताचा जागतिक पुढाकार

यूएन (United Nations) आणि डब्ल्यूएचओ (World Health Organization) यांनी २५ जुलैला “World Drowning Prevention Day” जाहीर केला आहे. परंतु, भारताने, विशेषतः एमजीएमच्या पुढाकारातून, जलतरण साक्षरतेसाठी स्वतंत्र दिवस निश्चित करून १५ जून – जागतिक जलतरण साक्षरता दिन२१ जानेवारी – राष्ट्रीय जलतरण साक्षरता दिन आणि ५ ऑक्टोबर – राज्य जलतरण साक्षरता दिन अशा तीन पातळ्यांवरील अभियानाला मूर्त रूप दिले आहे.

ही केवळ जनजागृती नव्हे, तर प्रत्येक नागरिक जलतरण साक्षर व्हावा हा उदात्त हेतू आहे.

प्रेरणेचा प्रकाश स्तंभ

गुरुवर्य अंकुशराव कदम हे शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि दूरदृष्टी असलेले क्रीडा प्रेरक आहेत. त्यांच्या विचारांनी असंख्य लोकांना आपल्या कार्यात नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले “जागतिक जलतरण साक्षरता अभियान” हे भारताच्या क्रीडा आणि समाजसेवेच्या इतिहासातील एक सुवर्ण पान ठरले आहे.

“विद्वान असणे वेगळे, पण विद्या आणि विनम्रतेचा संगम म्हणजेच खरे दिव्यत्व – आणि तेच व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य अंकुशराव कदम.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *