पुणे ः महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने राज्यात फुटबॉल खेळाला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “महादेवा” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.
मेस्सीसोबत खेळण्याची अभूतपूर्व संधी
या योजनेचा सर्वात मोठा आकर्षण म्हणजे, निवड चाचणीतून निवड होणाऱ्या १३ वर्षांखालील मुला-मुलींना दिनांक १४ डिसेंबर, २०२५ रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची एक अभूतपूर्व संधी मिळणार आहे.

निवड चाचण्यांचे वेळापत्रक जाहीर
या सुवर्णसंधीसाठी राज्यातील १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
खेळाडूंसाठी महत्त्वाच्या सूचना
इच्छुक खेळाडूंनी चाचणीसाठी येण्यापूर्वी गुगल नोंदणी लिंकद्वारे आपली नोंदणी पूर्ण करावी. तसेच, खेळाडूंनी चाचणीस्थळी आपले मूळ आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करून, राज्यातील फुटबॉल खेळाला नवी दिशा देणाऱ्या या योजनेला यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
निवड चाचण्यांचे सविस्तर वेळापत्रक
जिल्हास्तर निवड चाचणी : २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर
विभागस्तर निवड चाचणी : ३ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर
राज्यस्तरीय निवड चाचणी : २४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर
या चाचण्यांच्या यशस्वी आयोजनासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन तांत्रिक सहकार्य करणार आहे.



