पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर यांच्या “चैतन्य” या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व नियतकालिकाचे कार्यकारी संपादक डॉ महेंद्र अवघडे व मुख्य संपादक डॉ राजेश रसाळ यांनी दिली.
महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अंक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. नियतकालिका मधून वर्षभरामध्ये राबविलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांची अहवाल वजा माहिती, विद्यार्थ्यांचा गुणगौरव कथा, कविता, लेख, एनएसएस एनसीसी, विद्यार्थी कल्याण मंडळ, ग्रंथालय, जिमखाना व विविध विभागांचे अहवाल, कार्यशाळा,चर्चासत्र, विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेली विशेष कामगिरी आदींचे प्रतिबिंब चैतन्य मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.
अंकाचे मुखपृष्ठ लक्षवेधक आहे. मलपृष्ठ महाविद्यालयाचे वैभव अधोरेखित करते. उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड संदीप कदम, खजिनदार ॲड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव (प्रशासन) ए एम जाधव, इत्यादी मान्यवर प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच नियतकालिकाच्या संपादक मंडळातील सदस्य डॉ वसंत गावडे, डॉ राजेंद्र आंबवणे, डॉ राहुल पाटील, नितीन गरूड उपस्थित होते. उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे, उपप्राचार्य डॉ कल्याण सोनावणे व डॉ रमेश शिरसाट यांनी अंकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



