राज्य टेबल टेनिस स्पर्धा ः ईशान व नैशा यांना एकेरीत विजेतेपद, श्रेयस व रुचिताला उपविजेतेपद
पुणे ः बालुफ ऑटोमेशन चषक ५४ व्या आंतर जिल्हा व ८७ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत यजमान पुणे जिल्हा संघाने १७ वर्षाखालील मुले व मुली गटाच्या सांघिक लढती जिंकून दुहेरी मुकुट मिळविला. तसेच त्यांच्या ईशान खांडेकर व नैशा रेवसकर यांनी एकेरीचे अजिंक्यपद मिळवले. पुण्याच्या श्रेयस माणकेश्वर व रुचिता दारवटकर यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेसाठी बालुफ ऑटोमेशन या जर्मन कंपनीचे मुख्य प्रायोजकत्व असून सूरज फाउंडेशन, डेक्कन डाईज व केमिकल इंडस्ट्रीज, शारदा ग्रुप व मते रिॲलिटी हे सहप्रायोजक आहेत. ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित करण्यात आली आहे.
मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात पुण्याच्या ईशान या द्वितीय मानांकित खेळाडूने अंतिम लढतीत मुंबई जिल्हा संघाचा खेळाडू व अग्रमानांकित पार्थ मगर याला पराभूत केले. अटीतटीने झालेला हा सामना त्याने १२-१४,११-४, १३-११,९-११, ११-५ असा जिंकला. मुलींच्या एकेरीत द्वितीय मानांकित नैशा हिने आपलीच सहकारी व बाराव्या मानांकित रुचिता दारवटकर हिला चुरशीच्या लढतीनंतर पराभूत केले. हा सामना तिने ८-११,११-९,८-११,११-८, ११-३ असा जिंकला. रुचिता हिने उपांत्य लढतीत अग्रमानांकित सुक्राती शर्मा या ठाण्याच्या खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणले होते.
मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात टी एस टी संघाचा आठवा मानांकित खेळाडू आरव व्होरा याने अंतिम सामन्यात तृतीय मानांकित श्रेयस माणकेश्वर याच्यावर ११-९,१२-१०,१२-१० अशी सरळ तीन गेम्समध्ये मात केली. माणकेश्वर याने उपांत्य फेरीत परम भिवंडीकर या द्वितीय मानांकित खेळाडूवर आश्चर्यजनक विजय मिळविला होता.
मुलांच्या सतरा वर्षाखालील सांघिक विभागात पुणे संघाने अंतिम लढतीत टीएसटी (दी सबर्बन टेबल टेनिस असोसिएशन) संघाला ३-१ असे पराभूत केले. पहिल्या लढतीत पुण्याच्या शौरेन सोमण याला आकांक्ष साहू याच्याकडून १०-१२,५-११,११-१३ असा पराभव पत्करावा लागला मात्र ईशान खांडेकर याने दक्ष तलवार याच्यावर ११-५,१२-१०, ११-१ अशी मात करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. पाठोपाठ कौस्तुभ गिरगावकर याने आरव व्होरा याचा ११-७,११-६,४-११,११-६ असा पराभव केला व पुणे संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ईशान खांडेकर याने आणखी एक सामना जिंकताना साहू याचा १२-१०,११-८, ११-३ असा पराभव केला व पुणे संघास विजेतेपद मिळवून दिले.
मुलींच्या १७ वर्षाखालील गटात पुणे संघाने अंतिम लढतीत ठाणे संघावर ३-१ असा विजय मिळविला. एकेरीच्या पहिल्या लढतीत रुचिता दारवटकर हिला ठाण्याच्या सुक्राती शर्मा हिच्या विरुद्ध ५-११,७-११,४-११ अशी हार स्वीकारावी लागली मात्र नंतर नैशा रेवसकर हिने अन्वी करंबेळकर हिचा ११-९,११-८,८-११,११-९ असा पराभव करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ स्वरदा साने हिने अन्वी गुप्ते हिच्यावर ११-९,८-११,१४-१२,११-७ अशी मात करीत पुणे संघात २-१ अशी आघाडी मिळवून दिली एकेरीच्या परतीच्या सामन्यात नैशा हिने सुक्रातीचा ११-४,११-३,११-६ असा दणदणीत पराभव करून पुणे संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.



