वरिष्ठ राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकांचा वर्षाव
नागपूर ः नागपूर येथे २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या ३६ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या शूर तलवारबाजांनी सुवर्णपदकांची लयलूट करत ऐतिहासिक असा विक्रम रचला. वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही गटात दमदार कामगिरी करत लातूर जिल्ह्याने राज्यातील तलवारबाजी नकाशावर आपली छाप अधिक उठावदारपणे उमटवली आहे.
मुलींच्या गटात लातूरचा दणदणीत दबदबामुलींच्या वैयक्तिक इप्पी प्रकारात लातूरची चौकडी अव्वल ठरली. त्यात माही अरदवाड (सुवर्णपदक), जान्हवी जाधव (रौप्यपदक), ज्ञानेश्वरी शिंदे (कांस्य पदक) व रोहिणी पाटील (कांस्य पदक) या खेळाडूंचा समावेश आहे. या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले जाणारे चारही खेळाडू लातूर जिल्ह्यातील (अहमदपूर तालुका) असल्यामुळे हा विक्रम अतिशय अभुतपूर्व ठरला आहे.
तलवारबाजीच्या राज्यातील इतिहासात प्रथमच एका जिल्ह्यातील चारही खेळाडूंनी वरिष्ठ राष्ट्रीय इप्पी संघात स्थान मिळवले, ही उपलब्धी लातूरसाठी ऐतिहासिक माइलस्टोन मानली जात आहे.
मुलांच्या गटात सुवर्ण मालिका
मुलांच्या सांघिक गटात लातूरच्या संघाने अचूक रणनीती, वेग आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. विजेत्या संघात सुरज कदम, विशाल चापटे, भाऊराव कदम, साईप्रसाद जंगवाड या खेळाडूंचा समावेश होता. संघातील समन्वय, आक्रमक तसेच बचावात्मक खेळी आणि खेळाडूंची मानसिक ताकद यामुळे संघाने स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
लातूरचे राज्यात अव्वल स्थान
स्पर्धेच्या एकूण निकालात लातूरने मुलींच्या गटात तृतीय क्रमांक आणि मुलांच्या गटात तृतीय क्रमांक संपादन केला आहे. अशा प्रकारे दोन चॅम्पियनशिप एकाचवेळी पटकावत राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी मानदंड निर्माण केला आहे.
यशामागील मार्गदर्शन आणि पाठबळ
लातूरच्या या ऐतिहासिक कामगिरीत अनुभवी मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे. खेळाडूंना प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा दत्ता गलाले, वजीरोदीन काजी, मोसिन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच, या यशाचा विशेष उल्लेख करत जिल्हा क्रीडा कार्यालय, लातूर, शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे, प्रशांत माने, संतोष कदम, वैभव कज्जेवाड, मेहफूजखान पठाण, तसेच लातूरमधील सर्व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
लातूरच्या तलवारबाजांच्या या सुवर्णझळाळीने संपूर्ण मराठवाड्याचा क्रीडा लौकिक उज्ज्वल केला असून, येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही या खेळाडूंकडून अधिक भव्य कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



